काही लोकांना बाबांच्या मृत्यूमुळे आनंद झालाय, पण…; हरी नरकेंची मुलगी स्पष्टच बोलली

हरी नरके यांच्या जाण्याने सर्व स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. ५० पुस्तकांचे त्यांनी लेखन आणि संपादन केले होते. मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त व्हावा यासाठी त्यांनीच चळवळ सुरु केली होती.

हरी नरके यांच्या अशा अचानक जाण्याने नरकेंच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अशात त्यांची मुलगी प्रमिती नरके हिने आपल्या भावना व्यक्त केल्या आहे. प्रमितीने काही आठवणीही सांगितल्या आहे.

अहो जाओ नाही मला बाबा म्हणायला लावलं. बाबा नोकरी करत असताना कार्यक्रमही करत असायचा. ४ महिन्यांनी मला भेटायचा. त्यानेच मला वाचनाची सवय लावली. तो कायम माझ्या पाठिशी उभा होता. मला जे काही करु वाटलं त्याने मला ते करु दिलं, असे प्रमितीने म्हटले आहे.

मला ललित कला केंद्रात प्रवेश घ्यायचा होता. तेव्हा आरक्षण वापरायचं नाही, अशी सक्त ताकीद त्याने मला दिली होती. तो न वापरताच मी प्रवेश मिळवला होता. मी अभिनयात करीअर करायचं म्हटलं तेव्हा तो घाबरला होता. पण त्याने मला ते कधीच जाणवू दिलं नाही. तो आईजवळ हे सगळं सांगायचा, असेही तिने म्हटले आहे.

बाबाचे अनेक विरोधक आहेत. ज्यांना या घटनेमुळे खुप आनंद झाला आहे. मला सोशल मीडियावर ते दिसत असतात. मला त्या लोकांना फक्त हेच सांगायचंय की त्यांनी फक्त त्यांच्या विचारांनी तुमच्या विचारांचं खंडन केलंय. तुमच्यात धमक असेल तर तुमच्या विचारांनी त्यांच्या विचारांचे खंडन करा, असे प्रमितीने म्हटले आहे.

तसेच शिवीगाळ करणं आणि आनंद व्यक्त करणं हा तुमचा कमीपणा आहे जो तुम्ही सर्वांसमोर आणत आहात. त्याने माझा बाबा अजून मोठा होतोय. मी स्वत:ला प्रचंड नशीबवाण मानते की मी हरी नरकेंची मुलगी आहे. मी समाजकार्याच्या क्षेत्रात नाही, पण माझ्या पद्धतीने मी त्यांचा हा वारसा पुढे नेत राहणार, असेही प्रमितीने म्हटले आहे.