Valmik Karad : मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मकोका अंतर्गत कारवाई करण्यात आलेल्या वाल्मिक कराडला(Valmik Karad) बीड न्यायालयाने सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या निर्णयानंतर परळी आणि केज परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले असून, कराड समर्थकांनी आक्रमक निदर्शने सुरू केली आहेत.
या निदर्शनांमध्ये टॉवरवर चढणे, ठिय्या आंदोलन करणे, आत्मदहनाचा प्रयत्न आणि रस्त्यांवर टायर्स जाळणे यांसारखे प्रकार घडत आहेत. वाल्मिक कराडला केज न्यायालयात हजर करण्याऐवजी बीड न्यायालयात नेण्यास सीआयडीने अर्ज केला होता, जो न्यायालयाने मंजूर केला.
कराडला(Valmik Karad) केजहून बीडकडे नेण्याच्या मार्गावर पोलिसांच्या ताफ्यात चार अनोळखी वाहने घुसल्याने चर्चेला उधाण आले आहे. पोलिसांच्या ताफ्यात या गाड्या कशा शिरल्या आणि सहीसलामत बाहेर कशा पडल्या, याबद्दल पोलिसांकडून चौकशी सुरू आहे.
दरम्यान, कराडवर झालेल्या कारवाईनंतर बीडच्या काही भागांमध्ये तणावाचे वातावरण आहे. पांगरी गावात कराडवरील खोटे गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी आक्रमक निदर्शने झाली, तर परळी शहरातील व्यापाऱ्यांनी दहशतीमुळे दुकाने बंद ठेवली. धर्मापुरी आणि शिरसाळा येथेही शांततेत बंद पाळण्यात आला.
वाल्मिक कराडला(Valmik Karad) पोलीस कोठडीत पाठवताना बीड न्यायालयाबाहेर कराड समर्थक आणि विरोधी गट यांच्यात घोषणाबाजी झाली. कराडला केज पोलीस ठाण्यात आणून त्याच्या अटकेची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आणि सीआयडी व एसआयटीच्या अधिकाऱ्यांनी त्याची चौकशी केली.