Eknath Shinde : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत मोठ्या संख्येने नेते, पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी सहभागी झाले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील उबाठा गटाचे माजी आमदार उत्तमराव खंदारे, रविकांत पाटील आणि माजी जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर वाशीम जिल्ह्यातील वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष अनिल गिरकर, तसेच सरपंच संघटनेचे अध्यक्ष संदीप ठाकूर आणि माजी पोलीस उपअधीक्षक रायते यांनीही शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला.
या प्रवेश सोहळ्यात वाशीम जिल्ह्यातील ५३ सरपंच, २३ उपसरपंच आणि ६३ ग्रामपंचायत सदस्य यांचा समावेश होता. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षात सामील झालेल्या सर्वांचा स्वागत करत त्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अहिल्यानगर आणि नेवासातूनही मोठे समर्थन
पुण्यश्लोक अहिल्यानगर जिल्ह्यातून श्रीराम महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष सागर बेग, श्रीराम महासंघाचे अध्यक्ष आकाश बेग, तसेच उबाठा गटाचे नेवासा नगरपंचायतीतील माजी नगरसेवक सचिन वडागळे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा जिल्हा सरचिटणीस मनोज भिसे आणि अहिल्यानगरमधील अनेक नगरसेवक व पदाधिकारीही या सोहळ्यात सहभागी झाले.
शिंदे यांचे नव्या शिवसैनिकांना मार्गदर्शन
शिवसेनेत मोठ्या प्रमाणात होणाऱ्या प्रवेशांबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री शिंदे यांनी महायुती सरकारच्या कामगिरीमुळे लोकांचा विश्वास वाढत असल्याचे सांगितले. “गेल्या अडीच वर्षांत आपण जनहितासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. त्यामुळेच शिवसेनेमध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे,” असे ते म्हणाले.
“गाव तिथे शिवसेना, घर तिथे शिवसैनिक” हे ब्रीदवाक्य पुढे नेण्यासाठी नव्या सदस्यांनी कार्यरत राहावे, असे आवाहन त्यांनी केले. पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीवरही त्यांनी भर दिला आणि नव्या शिवसैनिकांना गावातील प्रश्न सोडवण्यासाठी मदतीचे आश्वासन दिले.
महत्त्वाच्या नेत्यांची उपस्थिती
या कार्यक्रमाला आमदार भावना गवळी, शिवसेना उत्तर महाराष्ट्र सचिव भाऊसाहेब चौधरी, शिवसेना सचिव सुशांत शेलार, शिवसेना प्रवक्त्या प्रा. ज्योती वाघमारे, सोलापूर जिल्हाप्रमुख मनीष काळजे, नाशिक जिल्हा संघटक योगेश म्हस्के आणि अनेक प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
शिवसेनेच्या वाढत्या जनाधारामुळे आगामी काळात पक्षसंघटना अधिक बळकट होईल, असे संकेत या पक्षप्रवेशामुळे मिळत आहेत.