ताज्या बातम्याराजकारण

BJP : आजवर इतरांना अडचणीत आणणारा भाजपचा मोठा नेता स्वत:च अडचणीत अडकला? आमदारकी धोक्यात?

BJP : इतर राजकीय नेत्यांना अडचणीत आणणारे भाजप आमदार सुरेश धस स्वतःच कायदेशीर अडचणीत सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते मेहबूब शेख यांनी त्यांच्या विजयाला औरंगाबाद खंडपीठात आव्हान दिले असून, न्यायालयाने सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावली आहे. त्यामुळे धस यांची आमदारकी धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे.

निवडणुकीतील निकाल आणि आरोप
आष्टी मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवलेल्या सुरेश धस यांनी १,४०,५०७ मते मिळवत विजय मिळवला होता. त्यांचे प्रतिस्पर्धी अपक्ष उमेदवार भिमराव धोंडे यांना ६२,५३२ मते, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे मेहबूब शेख यांना ५२,७३८ मते मिळाली होती. धस यांनी तब्बल ७७,९७५ मतांनी विजय मिळवला होता.

मात्र, निवडणुकीदरम्यान धार्मिक कारणांवरून मतं मागणे, मतदानाच्या दिवशी मतदानाचे व्हिडिओ व्हायरल करणे, शासकीय कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून मतदान करणे आणि ईव्हीएम मशीनच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण करणे अशा गंभीर आरोपांसह मेहबूब शेख यांनी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. तसेच, निवडणूक अधिकाऱ्यांनी ईव्हीएम मशिनच्या सीलवर स्वाक्षरी न केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.

न्यायालयाची पुढील सुनावणी ५ मार्चला
या प्रकरणावर औरंगाबाद खंडपीठाने सुरेश धस आणि निवडणूक आयोगाला नोटीस बजावत खुलासा मागवला आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी ५ मार्चला होणार असून, न्यायालयाचा निर्णय काय असेल, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button