Madhya Pradesh : मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बुकना गावात राहणाऱ्या एका महिलेने आपल्या पतीविरोधात गंभीर आरोप केले असून, जुगाराच्या विळख्यात अडकलेल्या या नराधम पतीने पत्नीवर अनन्वित अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
जुगारात पत्नीची बोली
पीडितेच्या म्हणण्यानुसार, तिचा पती प्रदीप गौडला जुगाराचे आणि दारूचे गंभीर व्यसन होते. तो दररोज जुगार खेळत असे आणि घरातील वस्तू गमावून येत असे. मात्र, एका दिवशी तो जुगारात इतका हरला की, त्याने पत्नीचीच बोली लावली. घरी परतल्यावर त्याने पत्नीला सांगितले की, “तुला मी हरवले आहे. आता जर माझ्यासोबत राहायचे असेल तर पैसे द्यावे लागतील.”
पैसे द्यावे लागतील.”
पैसे न दिल्यामुळे क्रूर अत्याचार
पत्नीने पैसे देण्यास स्पष्ट नकार दिला असता, प्रदीप आणि त्याच्या कुटुंबीयांनी मिळून तिच्यावर अमानुष अत्याचार केले. विवस्त्र करून तिला बेदम मारहाण करण्यात आली. इतकेच नव्हे, तर तिच्या गुप्तांगात विजेचा शॉक देऊन तिच्यावर घृणास्पद अत्याचार करण्यात आला. या मारहाणीमुळे ती चालूही शकत नाही, असे तिने सांगितले.
न्यायासाठी संघर्ष
अत्याचारानंतर पीडित महिला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यासाठी पोहोचली. मात्र, तिथे तिच्या तक्रारीची योग्य ती दखल घेतली गेली नाही. अखेर, तिने आई-वडिलांसह पोलीस अधीक्षक कार्यालय गाठले.
पोलीस कारवाई सुरू
या प्रकरणी पोलिसांनी पती प्रदीपसह आणखी दोघांवर गुन्हा दाखल केला असून, लवकरच आरोपींना अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. पतीच्या सततच्या अत्याचारामुळे पीडित महिलेने त्याच्यासोबत राहण्यास स्पष्ट नकार दिला आहे.
ही घटना समाजासाठी एक गंभीर इशारा आहे. व्यसनांच्या आहारी गेलेले अनेक लोक कुटुंबासाठी धोकादायक ठरत आहेत. त्यामुळे समाजात अशा घटनांना आळा घालण्यासाठी कठोर कारवाई करण्याची गरज आहे.