Mamta Kulkarni : ९०च्या दशकात बॉलिवूडमध्ये चर्चेत असलेली अभिनेत्री ममता कुलकर्णी आता आध्यात्मिक मार्गावर आहे. मात्र, वाद तिचा पाठलाग सोडत नाहीत. २०२५ च्या महाकुंभ दरम्यान, किन्नर आखाड्याने तिला महामंडलेश्वर पद दिलं होतं, मात्र केवळ सात दिवसांतच हा मान काढून घेतला. अनेक साधू-संतांच्या विरोधानंतर तिला या पदावरून हटवण्यात आलं.
बॉलिवूड ते अध्यात्म – ममताचा प्रवास
एका टीव्ही शोमध्ये बोलताना ममता कुलकर्णीने आपल्या आध्यात्मिक प्रवासाबद्दल खुलासा केला. ती म्हणाली, “१९९७ मध्ये माझ्या आयुष्यात गुरु आले आणि त्यानंतर मी बॉलिवूड सोडलं.” तिने सांगितलं की, बॉलिवूडमध्ये असतानाही ती नवरात्रीचे उपवास करत होती आणि ध्यानधारणा करत होती. मात्र, याच काळात ताज हॉटेलमध्ये दोन पेग घेण्याचीही चर्चा होती.
जेव्हा तिला यासंदर्भात विचारण्यात आलं, तेव्हा तिने स्पष्ट केलं, “मी शूटिंगला जाताना तीन बॅगा ठेवत असे – एक कपड्यांची, एक माझ्या मंदिरासाठी. माझ्या खोलीत नेहमी पूजेची तयारी असे.” पुढे ती म्हणाली, “माझ्या गुरूंनी ओळखलं की बॉलिवूड मला या मार्गावर जास्त काळ राहू देणार नाही, त्यामुळे त्यांनी मला एका ठिकाणी १२ वर्षं तपश्चर्येसाठी पाठवलं.”
महामंडलेश्वर पदावरून हटवण्यामागचं वादळ
ममता कुलकर्णीला महामंडलेश्वर पदावरून हटवण्यामागे किन्नर आखाड्यातील अंतर्गत संघर्ष कारणीभूत असल्याचं समोर आलं आहे. आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी आणि किन्नर आखाड्याचे संस्थापक अजय दास यांच्यातील मतभेदांनी हा वाद पेटला. अजय दास यांनी त्रिपाठी यांना पदावरून हटवण्याची धमकी दिली, मात्र त्रिपाठी यांनी हा दावा फेटाळून लावला. या संघर्षामुळेच दोघांनाही पदावरून काढण्यात आलं.
ममता कुलकर्णी म्हणते की, “मला महामंडलेश्वर व्हायचं नव्हतं, मात्र आचार्य लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांच्या आग्रहामुळे मी होकार दिला.” मात्र, हा अध्यात्मिक मान तिला फार काळ टिकवता आला नाही आणि अखेर तिला पदावरून हटवण्यात आलं.
बॉलिवूडची ग्लॅमरस अभिनेत्री ते साध्वी – प्रवास वादग्रस्तच!
ममता कुलकर्णीचं आयुष्य नेहमीच चर्चेत राहिलं आहे – आधी बॉलिवूडमधील बोल्ड अभिनेत्री म्हणून आणि आता अध्यात्माच्या मार्गावरही वाद तिचा पिच्छा सोडताना दिसत नाहीत. महामंडलेश्वर पदावरून झालेली हकालपट्टी आणि किन्नर आखाड्यातील राजकारण यामुळे तिच्या आध्यात्मिक प्रवासावर नवा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.