ताज्या बातम्याराजकारण

Aditya Thackeray : मुंबईची भाषा मराठीच! माफी मागा अन्यथा.., RSS च्या भय्याजी ‘त्या’ जोशींच्या विधानावर आदित्य ठाकरे थेट इशारा

Aditya Thackeray : मुंबईतील घाटकोपरमध्ये बोलताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे भैय्याजी जोशी यांनी केलेल्या वक्तव्याने मोठा वाद निर्माण केला आहे. त्यांनी “मुंबईत येणाऱ्याने मराठी शिकायलाच पाहिजे असे नाही, घाटकोपरची भाषा गुजराती आहे,” असे वक्तव्य केले. त्यांच्या या विधानावर आता राजकीय वातावरण तापले असून आदित्य ठाकरे यांनी त्यांच्यावर टीका करत माफीची मागणी केली आहे.

आदित्य ठाकरे यांची भैय्याजी जोशींवर टीका

आदित्य ठाकरे यांनी भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर संतप्त प्रतिक्रिया देत म्हटले की, “घाटकोपरची भाषा गुजराती आहे, असे सांगणाऱ्या जोशी यांना बुलेट ट्रेन कोणासाठी हवी आहे, याचे उत्तर सापडले आहे.”

त्यांनी पुढे म्हटले, “मुंबईत देशभरातून अनेक लोक आपली स्वप्ने पूर्ण करण्यासाठी येतात आणि येथे मोठे होतात. मात्र, या मुंबईची आणि महाराष्ट्राची भाषा मराठीच आहे, हे भैय्याजी जोशी यांनी लक्षात ठेवावे. त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी आम्ही करू.”

सरकारवरही साधला निशाणा

ठाकरे यांनी याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, “फडणवीस यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिला, असे सांगत सेलिब्रिटींकडून ट्विटही करून घेतले. मात्र, आमच्या महाविकास आघाडी सरकारने सुरू केलेले ‘मराठी भाषा भवन’ हे प्रकल्प या सरकारने स्थगित केले. तसेच मराठी नाट्यकलेच्या दालनावरही गदा आणली. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अपमानासंदर्भात कोश्यारी, कोरटकर, सोलापूरकर यांच्या विधानांमुळे आधीच नाराजी आहे. आता हे आणखी किती सहन करायचे, याचा विचार करण्याची वेळ आली आहे.”

राम कदम यांनी घेतला भैय्याजी जोशी यांचा बचाव

या वादावर भाजप आमदार राम कदम यांनी प्रतिक्रिया देत भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्याचा योग्य अर्थ लावण्याची गरज आहे, असे सांगितले. ते म्हणाले, “भैय्याजी जोशी हे समर्पित आणि त्यागी जीवन जगणारे व्यक्ती आहेत. त्यांच्या बोलण्याचा भाव समजून घ्यायला हवा.”

भैय्याजी जोशी यांच्या विधानावरून राजकीय वातावरण तापले असून आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उत्तर काय असते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Related Articles

Back to top button