Mahadev Munde : परळीतील महादेव मुंडे खून प्रकरणाने पुन्हा एकदा परळी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. या प्रकरणात मृत महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केलेले आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत. त्यांनी पोलिसांवर कलमांमध्ये बदल करून तपासावर परिणाम झाल्याचा ठपका ठेवला आहे. यामुळे परळी पोलिस आणि गृहखातं बदनाम होत असल्याचं स्पष्ट होत आहे.
महादेव मुंडे यांचा 14 महिन्यांपूर्वी क्रूरपणे खून झाला होता. त्यांच्या पत्नीने या घटनेमागचं सत्य उघड करण्यासाठी आवाज उठवला आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितलं की, त्यांच्या पतीला कोणत्याही प्रकारचं तणाव नव्हतं, तो नेहमी आनंदी असायचा, त्यामुळे या घटनेमागचं कारण अजूनही कळू शकलेलं नाही.
त्यांनी आरोप केला की, खून प्रकरणात भारतीय दंड संहितेच्या (IPC) 302 कलमाचा समावेश होता, परंतु सध्याचे परळी पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी आर. के. नाचण यांनी हे कलम बदलून प्रकरण कमकुवत केलं. यामुळे आरोपींवर योग्य कारवाई होऊ शकत नसल्याचं पोलिस ठाण्यातून सांगितलं जात आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांचा प्रश्न आहे की, “कलम बदलले म्हणून आरोपींना शोधण्याचं काम थांबवायचं का? आणि न्याय मिळवायचा अधिकार हिरावून घ्यायचा का?”
ज्ञानेश्वरी यांनी पोलिसांवर वर्दीचा योग्य वापर न केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटलं की, “जर ही घटना त्यांच्या कुटुंबावर घडली असती, तर त्यांनी असं वागलं असतं का?” त्या पुढे म्हणाल्या की, सुरेश धस यांनी याप्रकरणी घेतलेली भूमिका सकारात्मक असून त्यांनी जातीयतेच्या पलीकडे जाऊन आरोपी शोधण्याचा आग्रह धरला आहे.
आता ज्ञानेश्वरी मुंडे मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांची भेट घेऊन न्यायासाठी लढण्याचा निर्धार केला आहे. त्यांच्या या लढ्यामुळे परळीतील पोलिसांवर पुन्हा एकदा जबाबदारी येऊन ठेपली आहे.