Swargate ST station : पुण्यातील स्वारगेट, शिवाजीनगर आणि पुणे स्टेशन एसटी स्थानकांमध्ये सुरक्षेचा अभाव असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. स्वारगेट बस स्थानकात सुरक्षारक्षकांचा अहोरात्र बंदोबस्त असतानाही आणि पोलिसांची गस्त वाढवण्यात आली असतानाही शनिवारी (८ मार्च) पहाटे एका प्रवाशाचा लॅपटॉप चोरीला गेला. या घटनेमुळे सुरक्षेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
बसमध्ये ठेवलेली बॅग झाली गायब
वाकड येथे राहणारे केतन मोरे (नाव बदलले आहे) हे शनिवारी पहाटे रायगड जिल्ह्यातील महाड येथे जाण्यासाठी स्वारगेट एसटी स्थानकावर पोहोचले. त्यांनी पत्नी आणि मुलासह महाडसाठी एसटीचे तिकीट घेतले व बसमध्ये बसले. प्रवासादरम्यान त्यांनी जवळील सामान आणि कंपनीचा दिलेला लॅपटॉप वरील कॅरिअरमध्ये ठेवला. काही वेळात बस सुटण्याच्या तयारीत असताना त्यांनी सामान तपासले असता लॅपटॉपची बॅग गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. बसमध्ये आणि आजूबाजूला शोध घेतला, पण बॅग मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी तात्काळ स्वारगेट पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली.
कडेकोट बंदोबस्त असूनही चोरटे सक्रिय
स्वारगेट बस स्थानकाच्या आवारात सुरक्षा वाढवण्यात आली असूनही चोरीच्या घटना घडत आहेत. बलात्काराच्या घटनेनंतर पोलिसांची गस्त वाढवली गेली, ‘सीआर मोबाइल पॉइंट’मध्ये पोलीस तैनात आहेत, तरीही चोरटे सक्रिय असल्याचे दिसत आहे.
या प्रकरणाचा तपास उपनिरीक्षक बाळू शिरसाट करत असून, या घटनेनंतर स्थानकातील सुरक्षेची स्थिती अधिकच चिंताजनक ठरली आहे. प्रवाशांनी आपल्या सामानाची अधिक काळजी घ्यावी, असा इशारा पोलिसांकडून देण्यात आला आहे.