Aurangzeb : औरंगजेब उत्तम प्रशासक, त्याच्या काळात भारताचा GDP 24 टक्के अन् सीमा अफगाणिस्तानापर्यंत: अबू आझमी
Aurangzeb : समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांनी औरंगजेब हा उत्तम प्रशासक होता, असा दावा करताना भारताची सीमा अफगाणिस्तान आणि बर्मापर्यंत होती, असे म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यावरून राजकीय वातावरण तापले आहे.
आझमी यांनी औरंगजेबाच्या काळात भारताला ‘सोने की चिडीयाँ’ म्हणत असत, तसेच त्यावेळी देशाचा जीडीपी 24 टक्के होता, असा दावा केला. त्यामुळेच इंग्रज भारतात आले, असेही त्यांनी सांगितले. शिवाय, छत्रपती शिवाजी महाराज आणि औरंगजेब यांच्यातील संघर्ष धार्मिक नसून राजकीय होता, असेही त्यांनी स्पष्ट केले.
याशिवाय, औरंगजेबाची प्रतिमा चुकीच्या पद्धतीने साकारली जात असल्याचे सांगत, त्याने अनेक मंदिरे बांधली असल्याचा दावा आझमी यांनी केला. तसेच तो क्रूर प्रशासक नव्हता, असा त्यांचा युक्तिवाद होता.
मात्र, औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना दिलेल्या अत्याचारांविषयी विचारले असता, आझमी यांनी उत्तर न देता संवाद टाळला. त्यांच्या वक्तव्यावरून मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
राम कदम यांचा प्रतिवाद
भाजप आमदार राम कदम यांनी आझमी यांच्या वक्तव्यावर तीव्र प्रतिक्रिया देत, त्यांना इतिहासाची योग्य माहिती नाही, असे म्हटले. उद्या सभागृहात आझमी येणार असतील, तर मी त्यांना इतिहासाचं पुस्तक देणार आहे, असेही कदम यांनी सांगितले.
इतिहासकार इंद्रजीत सावंत यांच्यावर तक्रार
दरम्यान, करनी सेना अध्यक्ष अजय सिंग सेंगर यांनी इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांच्या विरोधात खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. सावंत यांच्यावर ब्राह्मण आणि राजपूत समाजाविरोधात चुकीची माहिती पसरवण्याचा आरोप करण्यात आला आहे. विदेशी लेखकांच्या संशोधनावर आधारित माहिती देत समाजात दुही माजवत असल्याचा दावा करनी सेनेने केला असून, त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे.