Suresh Dhasa : बीडच्या शिरूर तालुक्यातील बावी गावात एका व्यक्तीला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या घटनेत मारहाण करणारा व्यक्ती भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याची चर्चा सुरू होती. अखेर सुरेश धस यांनीही सतीश भोसले हा आपला कार्यकर्ता असल्याचे मान्य केले आहे. मात्र, त्याच्यावर तक्रार दाखल झाल्यास कायदेशीर कारवाई करण्याचे निर्देशही त्यांनी पोलिसांना दिले आहेत.
सुरेश धस यांची स्पष्ट भूमिका
“होय, *सतीश भोसले आमचा कार्यकर्ता आहे, मात्र कायदा सर्वांसाठी समान आहे. मी या घटनेबाबत पोलिसांकडून माहिती घेतली. *ही घटना दीड वर्षांपूर्वीची आहे आणि ती मुलीच्या छेडछाडीवरून घडली होती. जर कोणतीही तक्रार दाखल होत असेल, तर योग्य ती कारवाई केली जावी,” असे सुरेश धस यांनी स्पष्ट केले.
व्हिडीओ व्हायरल होण्यामागे हेतू?
सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. जर हा व्हिडीओ दीड वर्षांपूर्वीचा असेल, तर तो आता व्हायरल का करण्यात आला? त्यामागे काही राजकीय हेतू आहे का? याबाबत वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत.
सध्या राज्यात संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि जालन्यातील भोकदन येथे झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनांमुळे राजकीय वातावरण तापलेले आहे. अशा परिस्थितीत शिरूर तालुक्यातील हा व्हिडीओ समोर आल्याने त्याचे परिणाम राजकीय वर्तुळात उमटण्याची शक्यता आहे.