assembly elections : विधानसभा निवडणुकीच्या आधीच केजरीवालांना मोठा धक्का, तब्बल ८ आमदारांनी केला भाजपमध्ये प्रवेश

assembly elections : दिल्ली विधानसभा निवडणुकीला अवघे चार दिवस शिल्लक असताना आम आदमी पक्षाला (आप) मोठा धक्का बसला आहे. ‘आप’चे आठ आमदार भाजपमध्ये सामील झाले आहेत, त्यामुळे राजधानीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. पक्षाने उमेदवारी नाकारल्यानंतर वंदना गौर, रोहित मेहरूलिया, गिरीश सोनी, मदन लाल, राजेश ऋषी, बी. एस. जून, नरेश यादव आणि पवन शर्मा यांनी आमदारकीचा राजीनामा देत थेट भाजपमध्ये प्रवेश केला.

शनिवारी विधानसभेच्या अध्यक्षांकडे राजीनामा सादर केल्यानंतर या आठही आमदारांनी भाजपचे उपाध्यक्ष वैजयंत पांडा आणि दिल्ली प्रदेशाध्यक्ष वीरेंद्र सचदेवा यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी पांडा म्हणाले, “आजचा दिवस ऐतिहासिक आहे. ५ फेब्रुवारीला होणाऱ्या मतदानानंतर दिल्लीला ‘आपदा’पासून मुक्त करता येईल.”

‘आप’विरोधी वातावरण, भाजपचा हल्लाबोल

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील प्रचारसभेत ‘आप’ सरकारवर जोरदार हल्ला चढवला. “दिल्लीतील सत्ताधारी पक्षाविरुद्ध मोठा असंतोष आहे. हे ३जी सरकार आहे—घोटाळे, घुसपैठ आणि घपले असा याचा कारभार चालला आहे,” असे शहा यांनी स्पष्ट केले. दिल्लीकर आता ‘झाडू’ चालवून या पक्षाला साफ करतील, असा दावा त्यांनी केला.

‘आप’ आमदारावर हल्ला, केजरीवालांचे आरोप

नवी दिल्लीतील ‘आप’ आमदार मोहिंदर गोयल यांच्यावर रोहिणी परिसरात शनिवारी सकाळी हल्ला झाला. गोयल हे रिठाला मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. प्रचारादरम्यान हा हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजपकडून गुंडगिरी सुरू असल्याचा आरोप केला.

दिल्लीसाठी अर्थसंकल्पात काही नाही, पण भाजपला फायदा?

निवडणूक आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर दिल्लीसाठी कोणतीही विशेष घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आली नाही. मात्र, प्राप्तिकर मर्यादा सात लाखांवरून १२ लाखांपर्यंत वाढवल्याने मध्यमवर्गीय मतदारांचा कल भाजपकडे वळू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे.