Saif Ali Khan : सैफ हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट, खरा आरोपी शरीफुल नाहीच? जाणून घ्या महत्वाची अपडेट

Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांमध्ये खळबळ उडवली आहे. हल्लेखोराने सैफवर तब्बल सहा वार चाकूने केले, ज्यामुळे सैफ जखमी झाला. हल्ल्याच्या वेळी सैफने आपला मुलगा, जहांगिर (जेह) याला वाचवण्यासाठी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. झटापटीदरम्यान हल्लेखोर पळून गेला, मात्र त्याने सैफच्या शरीरावर गंभीर जखमा केल्या.

पोलिसांचा त्वरित तपास आणि आरोपीची अटक

घटनेनंतर पोलिसांनी त्वरेने हालचाल करत सैफ अली खानच्या घरासह लीलावती रुग्णालयात पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला. काही तासांतच पोलिसांनी हल्लेखोर शरीफुलला अटक केली. मात्र, तपासादरम्यान समोर आलेल्या नव्या पुराव्यांमुळे प्रकरणाला नवं वळण मिळालं आहे.

बोटांचे ठसे जुळले नाहीत

सीसीटीव्ही आणि आरोपीच्या बोटांचे ठसे तपासण्यात आले असता, सैफच्या घरातून गोळा केलेल्या ठश्यांशी ते जुळत नसल्याचे उघड झाले आहे. 22 जानेवारी रोजी आरोपीच्या बोटांचे ठसे आणि नमुने सीआयडी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. या अहवालामुळे हल्ल्याच्या प्रकरणात एकापेक्षा अधिक व्यक्ती सामील असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

सैफ अली खान आणि करिना कपूर खानचा जबाब नोंदवला

या प्रकरणात सैफ अली खानने पोलिसांसमोर आपला जबाब नोंदवला असून, हल्ल्याच्या रात्री नेमके काय घडले ते तपशीलवार सांगितले आहे. करिना कपूर खानचा देखील जबाब नोंदवण्यात आला आहे. हल्ल्यानंतर सैफवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून, सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.

तपासाला नवीन दिशा

हल्ल्याच्या वेळी सीसीटीव्हीमध्ये दिसणाऱ्या व्यक्तीची ओळख आरोपी शरीफुलशी जुळत नसल्याने पोलिसांनी तपासाचा फोकस बदलला आहे. आता या प्रकरणात इतर आरोपींचा शोध सुरू असून, सैफ अली खानवर हल्ला नेमका कशासाठी झाला, याची कारणं शोधली जात आहेत.

सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण हे एक रहस्यमय वळण घेत असून, पुढील तपासातून या प्रकरणाचे गांभीर्य आणि सत्य समोर येईल, अशी अपेक्षा आहे.