ताज्या बातम्याक्राईम

Akola : शेतातील धूप जाळलं अन् घडलं भयानक; चिमुकलींसमोरच जन्मदात्या आईचा गेला जीव, सगळा गाव ढसाढसा रडला

Akola : अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील काजळेश्वर येथे मधमाशांच्या हल्ल्यात एका महिलेला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतामध्ये पूजेदरम्यान अचानक मधमाशांनी हल्ला केला, ज्यामुळे रेश्मा आतिश पवार (३०) या विवाहित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

रेश्मा पवार आणि त्यांचे कुटुंबीय हरभरा काढण्यासाठी शेतात गेले होते. कापणीपूर्वी पारंपरिक पूजेचे आयोजन करण्यात आले होते. पूजेदरम्यान अगरबत्ती व धूप पेटवल्याने झालेल्या धुरामुळे शेजारील झाडावरील मधमाशांचे पोळ हलले.

या कारणामुळे मधमाशांनी अचानक उपस्थितांवर हल्ला चढवला. या हल्ल्यात रेश्मा पवार गंभीर जखमी झाल्या आणि त्यांना तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

या घटनेत रेश्मा पवार यांच्यासह सहा जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये नियती अतिश पवार, महेक अतिश पवार, मीरा प्रकाश पवार (गंभीर), कावेरी प्रमोद राठोड, शेजल प्रमोद राठोड, धनंजय प्रमोद राठोड आणि प्रकाश पांडू पवार यांचा समावेश आहे. सर्व जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

रेश्मा पवार यांच्या निधनामुळे त्यांच्या दोन लहान मुली आणि कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून, नैसर्गिक आपत्तीमुळे घडणाऱ्या अशा घटनांबाबत अधिक सतर्कता बाळगण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

Related Articles

Back to top button