ताज्या बातम्याराजकारण

Sanjay Shirsat : दोन्ही शिवसेना एकत्र येणार, संजय शिरसाट यांनी दिले मोठे संकेत, म्हणाले आजही मनाला यातना होतात

Sanjay Shirsat : शिवसेनेत फूट पडून *अडीच वर्षे उलटली असली, तरी दोन गट पुन्हा एकत्र यावेत अशी शिवसैनिकांची इच्छा आहे, असे मोठे विधान शिवसेना नेते आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी केले आहे. “शिवसेना वेगळी झाल्याचे दुःख आहे. आता दोन्ही गटांना जोडण्याची वेळ आली आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

“शिवसेनेच्या फाटाफुटीमुळे आजही वेदना होतात” – संजय शिरसाट

‘एबीपी माझा’ला दिलेल्या मुलाखतीत संजय शिरसाट यांनी सांगितले की, “शिवसेना दोन गटांत विभागली गेली याचे आजही दुःख आहे. आम्ही कोणत्याही शिवसैनिकाशी बोलतो, तेव्हा जुने नाते तसचे असल्याची जाणीव होते. मात्र, वेगवेगळ्या पक्षांत असल्यामुळे मनात अंतर आले आहे, हे कटू सत्य आहे.”

ते पुढे म्हणाले, “भाजपसोबतची युती समजू शकतो, कारण ती बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात होती. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय चुकीचा वाटला, कारण याच पक्षांनी शिवसेनेला सर्वाधिक त्रास दिला होता. त्याच वेळी वाटले की हा मोठा ऱ्हास ठरणार आहे.”

“शिंदे-ठाकरे पुन्हा एकत्र यावेत का?”

यावर उत्तर देताना संजय शिरसाट म्हणाले, “दोघांमधील मतभेद मिटवून जर ते एकत्र आले, तर माझा कोणताही आक्षेप नाही. मात्र, तशी तयारी दोन्ही बाजूंनी हवी. शिवसेनेला फूट पाडणाऱ्या लोकांनीही याचा विचार करावा. माफी मागितल्यास चुका दुरुस्त होऊ शकतात, पण आता तसे होईल का, हा प्रश्न आहे.”

“राज-उद्धवही एकत्र आले नाहीत, मग आता?”

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांना एकत्र आणण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. होडिंग लावण्यात आले, उपोषण झाले, पण ते एकत्र आले नाहीत. त्यामुळे, शिंदे आणि ठाकरे यांच्यासाठीही परिस्थिती वेगळी नाही.

संजय शिरसाट पुढे म्हणाले, “दोन्ही गट एकत्र यायला हरकत नाही, पण अपमानाच्या जखमा भरायला वेळ लागतो. कोण पुढाकार घेणार, हेही महत्त्वाचे आहे. एकमेकांवर टीका करून नंतर एकत्र येणे अवघड असते. जर दोघांनी दोन पावले मागे घेतले, तर तोच योग्य तोडगा असू शकतो.”

“आदित्य ठाकरे दोन्ही गटांना एकत्र आणू शकतात का?”

यावर उत्तर देताना शिरसाट म्हणाले, “आदित्य ठाकरेंना संघर्षाचा इतिहास माहिती नाही. उद्धव ठाकरे यांनी संघर्ष पाहिला आहे. त्यामुळे, हा पुढाकार घेतल्यास अनुभवी नेत्यांकडूनच शक्य होईल.”

शेवटी त्यांनी स्पष्ट केले की, “आजही अनेक शिवसैनिक एकमेकांशी संवाद साधतात, पण मनात भीती असते. जर जास्त विलंब झाला, तर दोन्ही गटांमधील दरी एवढी मोठी होईल की ती भरून निघणार नाही. मात्र, अजूनही परिस्थिती हाताबाहेर गेलेली नाही.”

Related Articles

Back to top button