Dhananjay Munde : ब्रेकींग! धनंजय मुंडे यांना न्यायालयाचा दणका, ‘या’ प्रकरणात ठरवलं दोषी

Dhananjay Munde : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना वांद्रे कौटुंबिक न्यायालयाने घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवले आहे. करूणा शर्मा यांनी केलेले आरोप न्यायालयाने मान्य केले असून, मुंडे यांना दरमहा २ लाख रुपयांची पोटगी देण्याचे आदेश दिले आहेत.

यापूर्वी, संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि कृषीमंत्री असताना २७५ कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपांमुळे त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत होती. आता, घरगुती हिंसाचार प्रकरणात दोषी ठरल्याने त्यांच्यावर आणखी दबाव वाढला आहे.

न्यायालयाच्या निर्णयाबद्दल प्रतिक्रिया देताना करूणा शर्मा म्हणाल्या, “न्यायालयाचे आभार मानते, आज सत्याचा विजय झालेला आहे. लोकांना वाटतं की कोर्टामध्ये न्याय मिळत नाही, पण मला न्याय मिळालेला आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “माझ्या आणि माझ्या दोन मुलांसाठी प्रत्येकी ५ लाख रुपयांची मागणी केली होती, मात्र आम्हाला २ लाख रुपयांची पोटगी मिळाली आहे. या मागणीसाठी मी पुन्हा उच्च न्यायालयात जाणार आहे.”

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी करूणा शर्मा यांचे अभिनंदन करताना म्हटले, “करूणा मुंडे या धनंजय मुंडे यांच्या पहिल्या पत्नी आहेत. त्यांना मारहाण झाली आहे आणि देखभाल खर्च देण्यात यावा, असे निर्देश कोर्टाने दिले आहेत.”

करूणा शर्मा यांनी आपल्या अनुभवांबद्दल सांगितले की, “माझ्या आईने आत्महत्या केली होती. जसा माझा छळ आता सुरू आहे, तसाच त्यांनाही त्रास दिला होता. मला दोन वेळा जेलमध्ये ठेवले गेले. येरवडा जेलमध्ये ४५ दिवस आणि बीडमध्ये १६ दिवस ठेवले. कलेक्टरच्या केबिनमध्ये मला वाल्मिक कराडच्या गुंडांनी मारहाण केली. माझी गाडी फोडली, माझ्या बहिणीचे शारीरिक शोषण झाले.”