Delhi : भयानक! अवघ्या १४ वर्षांच्या मुलाने बापाला जिवंत जाळलं; दाराची कडी लावली अन् बाहेरुन बघत राहिला, कारण…

Delhi : दिल्लीजवळील फरिदाबादच्या अजय नगर-२ परिसरात एक धक्कादायक घटना घडली आहे. अभ्यास करण्यास सांगितल्याने आणि पैसे चोरल्यावर वडिलांनी ओरडल्यानंतर, १४ वर्षीय मुलाने स्वतःच्या वडिलांना जिवंत जाळल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. सोमवारी रात्री ही घटना घडली.
कशी घडली घटना?
मूळचे उत्तर प्रदेशच्या मिर्झापूरचे रहिवासी असलेले ५५ वर्षीय मोहम्मद अलीम गेल्या चार महिन्यांपासून फरिदाबादमध्ये मुलासह भाड्याच्या घरात राहत होते. धार्मिक स्थळांसाठी देणगी गोळा करणे आणि मच्छरदाणी व अन्य वस्तू विकणे हे त्यांचे काम होते.
सोमवारी रात्री अलीम यांनी आपल्या मुलाला अभ्यास न केल्याबद्दल सुनावले आणि त्याला मारले. त्यामुळे नाराज झालेल्या मुलाने मध्यरात्री २ वाजता झोपेत असलेल्या वडिलांवर ज्वलनशील पदार्थ टाकून आग लावली. या नंतर त्याने घराचा दरवाजा बाहेरून बंद करून तेथेच उभा राहिला. आगीत होरपळून अलीम यांचा जागीच मृत्यू झाला.
शेजाऱ्यांनी पोलिसांना दिली माहिती
तळमजल्यावर राहणारे घरमालक रियाजुद्दीन यांनी मध्यरात्री आरडाओरड ऐकल्यावर छताकडे धाव घेतली. मात्र, जिन्याचा दरवाजा बंद होता आणि अलीम यांचे घरही बाहेरून कडेकोट लावले होते. आतून मदतीसाठी येणाऱ्या किंचाळ्या ऐकून त्यांनी तातडीने पोलिसांना आणि अग्निशमन दलाला संपर्क साधला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी आग नियंत्रणात आणली, मात्र तोपर्यंत अलीम यांचा मृत्यू झाला होता.
मुलाविरोधात गुन्हा दाखल
या घटनेनंतर १४ वर्षीय मुलगा घरातून पळून गेला, पण नंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. घरमालक रियाजुद्दीन यांनी पल्ला पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी आरोपीविरुद्ध विविध गंभीर कलमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. लवकरच त्याला ज्युवेनाईल जस्टिस बोर्डासमोर हजर करून बालसुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.
मुलाच्या वर्तणुकीबाबत शेजाऱ्यांची माहिती
शेजाऱ्यांच्या माहितीनुसार, अलीम यांचा मुलगा उडाणटप्पू स्वभावाचा आहे. तो शाळेत जात नव्हता आणि वारंवार वडिलांच्या खिशातून पैसे चोरत असे. सोमवारी रात्री त्याने पुन्हा हेच केल्याने अलीम यांनी त्याला रागावून मारहाण केली होती. त्यानंतर रात्री १० वाजता बाप-लेक जेवले आणि झोपी गेले. मात्र, मध्यरात्रीच मुलाने हे भयंकर कृत्य केले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून, पोलिसांकडून तपास सुरू आहे.