Devendra Fadnavis : १७ वर्षांच्या आजारी लेकरासाठी आईने विकलं मंगळसूत्र; व्यथा समजताच फडणवीस हळहळले, घेतला मोठा निर्णय

Devendra Fadnavis : भामरागड तालुक्यातील हितापाडी येथील १७ वर्षीय सुनील रमेश पुंगाटी या मुलावर नागपुरातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचाराचा खर्च मोठा असल्याने त्याच्या आईने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र विकून रुग्णालयात पैसे भरले. मात्र, ही बाब समजताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ दखल घेत मुलावर मोफत उपचार करण्याचे निर्देश दिले.
आई-वडिलांचा संघर्ष आणि मुख्यमंत्र्यांची तातडीची मदत
सुनीलला ताप आल्याने त्याची प्रकृती गंभीर बनली, त्यामुळे त्याला नागपुरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारासाठी मोठी रक्कम आवश्यक असल्याने त्याच्या आईने मंगळसूत्र विकून एक लाख रुपये उभे केले. आर्थिक अडचणींमुळे सुनीलचे आई-वडील उपाशी राहूनही उपचार सुरू ठेवण्याचा प्रयत्न करत होते.
या कठीण प्रसंगात मदतीसाठी वडिलांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून आपली व्यथा मांडली. गडचिरोली जिल्ह्याच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारलेल्या मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाची तत्काळ दखल घेत मोफत उपचार करण्याचे आदेश दिले.
मोफत उपचार आणि आर्थिक मदतीचा दिलासा
मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांना आवश्यक ती कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. त्यानुसार, त्या खासगी रुग्णालयाशी संपर्क साधून सुनीलच्या मोफत उपचाराची व्यवस्था करण्यात आली. याशिवाय, आईने मंगळसूत्र विकून भरलेली रक्कमही परत मिळणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.
मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील सुधारणांसाठी समिती स्थापन
या घटनेच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या कार्यपद्धतीत सुधारणा करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमार्फत आजारांचे पुनर्विलोकन, आर्थिक मदतीची नवीन निश्चिती आणि रुग्णालय संलग्नीकरणासाठी निकष ठरवले जाणार आहेत. यासंदर्भात शासन निर्णय काढण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली.
मुख्यमंत्र्यांच्या तातडीच्या निर्णयामुळे सुनीलला मोफत उपचार मिळणार असून, त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे.