Dhananjay Munde : राजीनामा देता की हकालपट्टी करू? फडणवीसांनी दम भरताच मुंडेंनी दिला राजीनामा, वाचा इनसाईड स्टोरी
Dhananjay Munde : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येचे फोटो सोमवारी समोर आल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली. अखेर सरकारवरील वाढत्या दबावामुळे मुंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा सुपूर्द केला. मुख्यमंत्र्यांच्या शिफारशीनंतर राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांचा राजीनामा मंजूर केला आहे.
राजकीय हालचाली आणि राजीनाम्याचा निर्णय
संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर जनतेत मोठा संताप उसळला. या घटनेमुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावरही दबाव वाढला. त्यामुळे तातडीने मुंबईतील ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानी रात्री बैठक बोलवण्यात आली. या बैठकीला अजित पवार, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुरुवातीपासूनच मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही होते. त्यांनी यापूर्वीही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबाबत चर्चा केली होती. मात्र, मुंडे यांनी राजीनामा देण्यास टाळाटाळ केली. शेवटी, “जर तुम्ही स्वतःहून राजीनामा दिला नाही, तर बडतर्फीची कारवाई करावी लागेल,” असा स्पष्ट इशारा फडणवीस यांनी दिला. परिणामी, मुंडेंकडे पर्याय उरला नाही आणि त्यांनी मंगळवारी सकाळी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला.
राजीनाम्यामागची कारणे
राजीनामा दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी ट्वीट करत यामागील कारण स्पष्ट केले. त्यांनी म्हटले की, “संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, ही माझी ठाम मागणी आहे. या प्रकरणाचा तपास पूर्ण झाला असून, आरोपपत्र दाखल झाले आहे. मात्र, या घटनेने मन व्यथित झाले आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून माझी प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी उपचार घेण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे.”
नागपूर अधिवेशन ते मुंबईतील निर्णय
हिवाळी अधिवेशनात आमदार सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरण उचलून धरले होते. त्यानंतर बीडमधील आमदार प्रकाश सोळंके आणि संदीप क्षीरसागर यांनीही आवाज उठवला. सरकारवरील दबाव वाढत गेला आणि अखेर पोलिसांनी वाल्मीक कराडला अटक केली. त्यानंतर मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी आणखीन तीव्र झाली. नागपूर अधिवेशनात चर्चेला आलेला हा मुद्दा अखेर मुंबईतील अधिवेशनात निकाली निघाला.
पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया
धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, “त्यांच्या निर्णयाचे मी स्वागत करते. मात्र, हा राजीनामा खूप आधीच व्हायला हवा होता. किंबहुना, त्यांनी मंत्रिपदाची शपथच घेऊ नये, असे मला वाटते. पण ‘देर आये, दुरुस्त आये’! देशमुख हत्येच्या घटनेत दोषींवर कठोर कारवाई व्हायलाच हवी.”
या संपूर्ण प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले असून, मुंडेंच्या राजीनाम्यानंतर पुढील राजकीय घडामोडींची सर्वांचे लक्ष लागले आहे.