Santosh Deshmukh : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावात सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी नवे धक्कादायक तपशील समोर येत आहेत. पोलिसांच्या तपासात मारेकऱ्यांनी संतोष देशमुखांचा छळ करताना व्हॉट्सअप ग्रुपवर लाइव्ह व्हिडीओ दाखवल्याचा गंभीर पुरावा मिळाला आहे. ‘मोकारपंती’ नावाच्या व्हॉट्सअप ग्रुपवर चार वेळा व्हिडीओ कॉल करून हा क्रूर प्रकार दाखवण्यात आला. हे कॉल फरार आरोपी कृष्णा आंधळेने केल्याचे समोर आले आहे.
खंडणीच्या मागणीपासून हत्येपर्यंतचा प्रवास
29 नोव्हेंबर 2024 रोजी वाल्मीक कराड आणि विष्णू चाटे यांनी ‘आवादा’ कंपनीच्या अधिकाऱ्याला खंडणीसाठी धमकावले. मात्र, याबाबत तक्रार दाखल झाली नाही. 6 डिसेंबर रोजी मस्साजोगमध्ये या प्रकरणावरून मोठा गोंधळ झाला. मात्र, पोलिसांनी कठोर कारवाई करण्याऐवजी आरोपींना सोडून दिले. त्यानंतर 9 डिसेंबरला संतोष देशमुख यांचे अपहरण झाले, पण गुन्हा दाखल होण्यास उशीर लागला. 14 जानेवारी 2025 रोजी वाल्मीक कराडचा हत्या प्रकरणात समावेश करण्यात आला, तर 4 मार्च 2025 रोजी धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला.
महत्त्वाचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न
विष्णू चाटे याने खंडणीसंबंधीची संभाषणं आणि इतर महत्त्वाचे पुरावे असलेला मोबाइल नष्ट केला, असा आरोप सीआयडीच्या दोषारोपपत्रात करण्यात आला आहे. तसेच, कृष्णा आंधळेने ‘मोकारपंती’ व्हॉट्सअप ग्रुपवर सरपंच संतोष देशमुख यांच्यावर होत असलेल्या छळाचे चार वेळा व्हिडिओ कॉलद्वारे प्रक्षेपण केले होते.
कृष्णा आंधळेने केलेले व्हिडिओ कॉल:
- 9 डिसेंबर, 5:14 PM – 17 सेकंद
- 9 डिसेंबर, 5:16 PM – 17 सेकंद
- 9 डिसेंबर, 5:19 PM – 2 मिनिटे 3 सेकंद
- 9 डिसेंबर, 5:26 PM – 2 मिनिटे 44 सेकंद
पोलिस तपासावर गंभीर प्रश्नचिन्ह
या प्रकरणात अनेकवेळा उशीर झाला. खंडणीच्या तक्रारीपासून हत्येच्या चौकशीपर्यंत पोलिसांनी तातडीने कारवाई केली असती, तर संतोष देशमुखांचा जीव वाचला असता का, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत असून, फरार आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.