Devendra Fadnavis : राज्यातील पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवरून महायुतीत पडद्यामागे मोठ्या राजकीय हालचाली सुरू आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर झालेल्या पालकमंत्र्यांच्या यादीबाबत नाराजी व्यक्त करत थेट दिल्लीतील भाजप नेत्यांकडे तक्रार केली होती.
त्यामुळे परदेशात असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रायगड आणि नाशिक जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाला तातडीने स्थगिती देण्याचे आदेश काढले. गिरीश महाजन यांच्यासारख्या प्रभावशाली नेत्याच्या नियुक्तीला स्थगिती दिल्यामुळे हे प्रकरण गंभीर असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यापूर्वी दिल्लीत मान्यतेसाठी पाठवण्यात आली होती. मुख्यमंत्री फडणवीस यांनी दावोसला जाण्यापूर्वी ही यादी जाहीर केली होती, मात्र नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्रीपदांवरून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. त्यामुळे फडणवीसांना तातडीने आदेश जारी करून या नियुक्त्यांना स्थगिती द्यावी लागली.
यासोबतच, एकनाथ शिंदे यांची नाराजी उघड झाली असून, ते साताऱ्यातील त्यांच्या मूळगावी जाऊन बसल्याचे समजते. शिवसेनेतील 20 आमदार फुटणार असल्याच्या चर्चांमुळे राजकीय अस्थिरता वाढली आहे. शिंदे गटातील काही आमदार भाजपसोबत जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे, ज्यामुळे पालकमंत्री पदाच्या स्थगितीचा संबंध या घडामोडींशी जोडला जात आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि गिरीश महाजन यांनी साताऱ्यात जाऊन शिंदे यांच्याशी चर्चा केली. जरी महायुतीच्या नेत्यांनी सर्व काही सुरळीत असल्याचे सांगितले असले, तरी पडद्यामागील हालचाली अजूनही सुरू आहेत.
शिंदे गटाला रायगड आणि नाशिक जिल्ह्यांचे पालकमंत्रीपद मिळावे, यावर आग्रही होते. मात्र, भाजपने कोकणातील कोणत्याही जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसला पालकमंत्रीपद न दिल्यामुळे रायगडचा पदभार अदिती तटकरे यांना सोपवला. तसेच, नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे राहण्याचा भाजपचा आग्रह होता, कारण आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.