Goa : रिक्षाचालकाने केलेल्या मारहाणीत माजी आमदाराचा मृत्यू, कारण वाचून हादराल

Goa : गोव्यातील फोंड्याचे माजी आमदार आणि काँग्रेस नेते लवू मामलेदार (६८) यांचा बेळगाव येथे झालेल्या हल्ल्यानंतर मृत्यू झाला. शनिवारी दुपारी त्यांच्या कारचा किरकोळ अपघात एका रिक्षासोबत झाला. अपघातानंतर रिक्षाचालकाने त्यांचा पाठलाग करत लॉजपर्यंत जाऊन त्यांच्याशी वाद घातला आणि मारहाण केली. त्यानंतर काही वेळातच मामलेदार लॉजच्या रिसेप्शनजवळ कोसळले. त्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
हल्ल्याचा तपास सुरू, सीसीटीव्ही फुटेज पोलिसांकडे
पोलिसांनी या प्रकरणी रिक्षाचालकाला ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे. हल्ल्याचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या ताब्यात असून त्याद्वारे तपास पुढे नेला जात आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रुग्णालयात भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
लवू मामलेदार: पोलीस अधिकारी ते आमदारपर्यंतचा प्रवास
लवू मामलेदार यांनी पोलीस सेवेतून निवृत्त झाल्यानंतर राजकारणात प्रवेश केला. २०१२ ते २०१७ या काळात ते गोवा विधानसभेचे आमदार राहिले. सुरुवातीला महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष (एमजीपी) मध्ये कार्यरत असलेले मामलेदार नंतर काँग्रेसमध्ये सामील झाले. २०२२ मध्ये त्यांनी मडकई मतदारसंघातून निवडणूक लढवली, मात्र त्यांना पराभव पत्करावा लागला.
अचानक निधनाने शोककळा
लवू मामलेदार यांच्या अचानक निधनाने गोवा आणि बेळगावमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन कन्या असा परिवार आहे. पोलीस प्रकरणाचा सखोल तपास करत असून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन देण्यात आले आहे.