Uttarakhand : तुला महत्त्वाचा रोल देणार, तू स्टार होणार! माजी मुख्यमंत्र्याच्या लेकीला स्वप्न दाखवलं अन् नंतर…

Uttarakhand : सिनेसृष्टीत मोठी संधी मिळवून देण्याचे आश्वासन देत माजी केंद्रीय मंत्री आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री डॉ. रमेश पोखरियाल निशंक यांच्या मुलीची फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. अभिनेत्री आणि चित्रपट निर्माती आरुषी निशंक यांच्याकडून दोन चित्रपट निर्मात्यांनी तब्बल ४ कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. या प्रकरणी आरुषी यांनी तक्रार दाखल केली असून, पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे.
“आँखों की गुस्ताखियां” चित्रपटाच्या नावाखाली आर्थिक फसवणूक
मुंबईतील निर्माते मानसी वरुण बागला आणि वरुण प्रमोद कुमार बागला यांनी “आँखों की गुस्ताखियां” या चित्रपटात आरुषी निशंक यांना महत्त्वाची भूमिका देण्याचे आश्वासन दिले होते. या चित्रपटात शनाया कपूर आणि विक्रांत मेस्सी मुख्य भूमिकेत असतील, असे सांगण्यात आले. मात्र, या भूमिकेसाठी ५ कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची अट घालण्यात आली.
आरुषी यांनी हा प्रस्ताव स्विकारला आणि टप्प्याटप्प्याने ४ कोटी रुपये दिले. त्यांना चित्रपटाच्या कमाईतून २० टक्के नफा मिळेल, तसेच स्क्रिप्ट आवडली नाही तर गुंतवणूक १५% व्याजासह परत केली जाईल, असेही आश्वासन देण्यात आले.
सामंजस्य करारानंतरही पैसे परत नाही
९ ऑक्टोबर २०२४ रोजी या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या आणि १० ऑक्टोबर रोजी आरुषी यांनी पहिला हप्ता म्हणून २ कोटी रुपये दिले. त्यानंतर २७ ऑक्टोबरला २५ लाख, ३० ऑक्टोबरला ७५ लाख आणि १९ नोव्हेंबरला आणखी १ कोटी रुपये त्यांनी दिले. मात्र, काही महिन्यांनंतरही चित्रपटाचे कोणतेही काम सुरू झाले नाही.
धमकी आणि गुन्हा दाखल
आरुषी यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली असता, दोन्ही निर्मात्यांनी पैसे देण्यास नकार दिला. इतकेच नव्हे, तर खोट्या प्रकरणांमध्ये अडकवण्याची आणि जीवे मारण्याची धमकीही दिली. त्यामुळे त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली.
उत्तराखंड पोलिसांनी या तक्रारीची दखल घेत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. वरिष्ठ पोलिस अधिकारी अजय सिंह यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले.
सिनेसृष्टीतील फसवणुकीवर प्रश्नचिन्ह
आरुषी निशंक या अभिनेत्री, चित्रपट निर्माती आणि पर्यावरणवादी कार्यकर्त्या आहेत. त्या नुकत्याच आलेल्या “तारिणी” या चित्रपटात झळकल्या होत्या. एका माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलीची अशाप्रकारे फसवणूक होत असेल, तर सामान्य कुटुंबातील कलाकार आणि विशेषतः महिलांच्या सुरक्षिततेविषयी गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.