---Advertisement---

Harshvardhan Sapkal : स्त्री-पुरुष समानतेचा विचार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला मान्य नाही, आजवर संघप्रमुख महिला का झाली नाही?- काँग्रेस

---Advertisement---

Harshvardhan Sapkal : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने मातृशक्तीला अभिवादन करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या सद्भावना पदयात्रेच्या उद्घाटनावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर जोरदार टीका केली.* त्यांनी संघाच्या विचारसरणीवर प्रश्न उपस्थित करत, “स्त्री-पुरुष समानता संघाला मान्य नाही. महिलांना फक्त वस्तूसारखे मानणारी ही प्रवृत्ती आहे. आजवर संघप्रमुख हे पद महिलेला का देण्यात आले नाही?” असा थेट सवाल केला.

समाजातील विषमता दूर करण्यासाठी संघर्ष आवश्यक – सपकाळ

मस्साजोग येथून सुरू झालेली सद्भावना पदयात्रा २३ किमीचा प्रवास करून नेकनूर येथे पोहोचली. यावेळी हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्यातील सध्याच्या परिस्थितीवर भाष्य केले. “राज्यात आका-खोक्या हा नवा खेळ रंगला आहे. याच्या विरोधात आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. संविधानाच्या मूल्यांवर आधारित समाज घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे.”

स्त्री-भ्रूणहत्येसारख्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधत त्यांनी बीड जिल्ह्यातील परिस्थिती चिंताजनक असल्याचे सांगितले. “बीड जिल्ह्यात स्त्री-पुरुष गुणोत्तर कमी आहे, ही बाब गंभीर आहे. महिला दिनाच्या निमित्ताने स्त्री-पुरुष समानतेचा संदेश समाजात पोहोचवण्याची गरज आहे,” असे ते म्हणाले.

संघाच्या विचारसरणीवर टीका

हर्षवर्धन सपकाळ यांनी संत परंपरा आणि सामाजिक सुधारकांच्या कार्याचा संदर्भ देत संघाच्या विचारसरणीवर टीका केली. “तुकाराम महाराजांनी अभंगांच्या माध्यमातून समाज प्रबोधन केले, पण त्यांच्या गाथा काहींनी पाण्यात बुडवल्या. संत ज्ञानेश्वरांनी गीता लोकभाषेत लिहिली, त्यांना त्रास देण्यात आला. सावित्रीबाई फुले यांनी मुलींसाठी शाळा सुरू केल्या, त्यावरही त्या काळी टीका झाली. याच प्रवृत्ती समाजातील बहुजन आणि प्रगतिशील विचारांना विरोध करतात,” असे त्यांनी नमूद केले.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना भाजपचे संरक्षण”

राज्यातील राजकीय वातावरणावर भाष्य करताना सपकाळ म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, तुकडोजी महाराज यांचा विचार हा ‘आयडिया ऑफ इंडिया’ आहे. मात्र, भाजपाच्या सत्ताकाळात छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्यांना मोकळीक देण्यात येत आहे. त्यांना सरकारकडून पुरस्कार देऊन गौरवण्यात येत आहे.”

सद्भावना पदयात्रा म्हणजे सामाजिक एकता आणि समतेचा संदेश

समाजातील विषमता दूर करण्यासाठी *सद्भावना पदयात्रा आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट करत, *”समाजात फूट पाडण्याचा भाजपचा विचार आहे. मात्र, आपल्याला पुरोगामी विचार घेऊन पुढे जायचे आहे. समानता आणि बंधुभावासाठी सद्भावना यात्रा सुरू केली आहे,”** असे हर्षवर्धन सपकाळ यांनी स्पष्ट केले.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---