Saif Ali Khan : बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवर घरात घुसलेल्या चोरट्याने चाकूने हल्ला केला. या घटनेदरम्यान सैफ आणि चोरट्यात झटापट झाली असल्याचे समजते. हल्ल्यानंतर सैफच्या सुरक्षा रक्षक आणि ड्रायव्हरने त्वरित हस्तक्षेप करून त्याला लीलावती रुग्णालयात दाखल केले.
मुंबई जॉइंट सीपी लॉ अँड ऑर्डर यांनी घटनेची पुष्टी करताना सांगितले की, सैफला लीलावती रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले आहे. आरोपीची ओळख पटविण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू आहे. पोलिसांचा अंदाज आहे की आरोपी सैफच्या(Saif Ali Khan) घरात काम करणाऱ्या मोलकरणीला भेटण्यासाठी आला असावा. आरोपीने आधी मोलकरणीवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे समजते.
तपासासाठी सात विशेष पथके
या हल्ल्याच्या तपासासाठी मुंबई पोलिसांनी सात विशेष पथके तयार केली आहेत. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत असून, सैफच्या घरातील कर्मचाऱ्यांची चौकशी करत आहेत. डॉक्टरांनी पुष्टी केली आहे की, सैफच्या शरीरावर सहा चाकूचे वार करण्यात आले असून, त्यापैकी दोन गंभीर आहेत. सैफच्या(Saif Ali Khan) टीमने एक निवेदन जारी करून या घटनेबद्दल माहिती दिली आहे. “सैफ अली खानच्या घरी चोरीचा प्रयत्न झाला असून त्याच्यावर शस्त्रक्रिया सुरू आहे. आम्ही मीडिया आणि चाहत्यांना धीर धरण्याची विनंती करतो. ही पोलीस तपासाची बाब आहे,” असे निवेदनात म्हटले आहे.
मोलकरणीवर पोलिसांचा संशय
पोलिसांनी सैफच्या(Saif Ali Khan) घरातील तीन कर्मचाऱ्यांचे जबाब नोंदवले असून मोलकरणीवर संशय व्यक्त केला आहे. हल्लेखोराने मोलकरणीवर प्रथम हल्ला केला आणि त्यावेळी दोघांमध्ये झटापट झाली. त्या आवाजावरून सैफ बाहेर आला आणि चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न केला, पण त्याच वेळी चोरट्याने सैफवर चाकूने वार केले.