ताज्या बातम्याक्राईम

Datta Gade : त्या मुलीला मी ७५०० रुपये दिलेत, दत्ता गाडेचा पोलिसांकडे दावा, बँक खाते तपासताच धक्कादायक बाब समोर

Datta Gade : स्वारगेट एसटी डेपोतील शिवशाही बसमध्ये २६ वर्षीय तरुणीवर झालेल्या अत्याचारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे सत्र न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. तपासादरम्यान रोज नवनवीन माहिती समोर येत असून, आरोपीच्या बँक खात्यातील व्यवहारांबाबत महत्त्वाचा खुलासा झाला आहे.

बँक खात्यात फक्त २४९ रुपये

या प्रकरणात आरोपीच्या वकिलाने गाडे आणि पीडितेच्या दरम्यान आर्थिक व्यवहार झाल्याचा दावा केला होता. त्यानंतर पोलिसांनी बँक खात्यांची चौकशी केली असता, गुन्हा घडल्याच्या वेळी आरोपीच्या खात्यात फक्त २४९ रुपये असल्याचे आढळले. त्यामुळे वकिलाने दावा केलेले ७,५०० रुपये नेमके कुठून आले, याचा तपास पोलीस करत आहेत.

आरोपीच्या पत्नीचा सवाल

दरम्यान, आरोपीच्या पत्नीनेही आपल्या पतीची बाजू मांडत, “बलात्कार झाला असेल, तर पीडितेचे कपडे फाटले का नाहीत? तिच्या शरीरावर कुठे ओरखडे का नाहीत? ती आधी बसमध्ये चढली आणि त्यानंतर दोन मिनिटांतच बाहेर आली, हे बलात्काराचे लक्षण आहे का?” असे प्रश्न उपस्थित केले.

फोन डिटेल्समधून संबंध नाकारला

आरोपीच्या वकिलाने गाडे आणि पीडिता यांची मागील एका महिन्यापासून ओळख असल्याचा दावा केला होता. त्यामुळे पोलिसांनी या दाव्याची पडताळणी करण्यासाठी दोघांचे फोन रेकॉर्ड तपासले. दोन वर्षांच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स (CDR) च्या तपासणीमध्ये पीडितेचा आणि आरोपीचा कोणताही संपर्क झालेला नाही, असे स्पष्ट झाले आहे.

आरोपीचा दावा खोटा

पोलिसांनी आरोपीच्या बँक खात्यातील व्यवहार, ऑनलाईन पेमेंट्स आणि मोबाईल ट्रान्झॅक्शन यांची सखोल चौकशी केली. गाडे याने पीडितेला पैसे दिल्याचा कोणताही पुरावा मिळालेला नाही. त्यामुळे ७,५०० रुपये दिल्याचा आरोपीचा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे.

या प्रकरणातील सत्य समोर आणण्यासाठी पुणे पोलीस तपास अधिक गतीने पुढे नेत आहेत.

Related Articles

Back to top button