Jitendra Awhad : अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बाळा नांदगावकर यांनी आणलेल्या महाकुंभच्या गंगाजलावर टीका करत गंगा नदीच्या स्वच्छतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांच्या या वक्तव्यावर काहींनी धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला. मात्र, अशा परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) नेते जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंच्या निर्भीडपणाचे कौतुक केल्याचे पाहायला मिळाले.
आव्हाड म्हणाले— ‘राज ठाकरेंनी हिम्मत दाखवली!’
आज माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांनी राज ठाकरेंची मिमिक्री करत त्यांच्या परखड बोलण्यावर प्रतिक्रिया दिली. “असं बोलायला हिम्मत लागते आणि राज ठाकरेंनी ती दाखवली!” असे आव्हाड म्हणाले. त्याचवेळी त्यांनी टीकाकारांवर निशाणा साधत म्हटले, “जर आम्ही असं काही बोललो असतो, तर आमच्या घरावर दगडफेक झाली असती, निषेध मोर्चे निघाले असते आणि आम्हाला देशद्रोही ठरवले असते.”
भारत हा लोकशाहीप्रधान देश असून प्रत्येकाला आपले मत मांडण्याचे स्वातंत्र्य आहे, असे सांगत आव्हाड पुढे म्हणाले, “मी राज ठाकरेंचे अभिनंदन करतो की महाराष्ट्रात असा एक नेता आहे जो निर्भयपणे आपले विचार मांडतो. आम्हाला भीती वाटते की कोणी मागे लागेल, पण राज ठाकरे बिनधास्त बोलले आणि त्यांच्या धाडसाला माझा सलाम आहे!”
राज ठाकरेंच्या या वक्तव्यावर सामाजिक आणि राजकीय स्तरावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत असल्या तरी जितेंद्र आव्हाड यांनी मात्र त्यांचं समर्थन करत त्यांच्या “डेरिंगला” सलाम ठोकला आहे.