Krishna Andhale : मोठी बातमी! संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार कृष्णा आंधळेचा मृत्यू? नव्या दाव्याने खळबळ

Krishna Andhale : मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. पोलिस तपास वेगाने सुरू असला तरी राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे नेते संदीप क्षीरसागर यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.

त्यांनी हत्या प्रकरणातील चौथा आरोपी कृष्णा आंधळे हा जिवंत नसेल, असा संशय व्यक्त करत खळबळ उडवली आहे. तसेच, “धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतल्याशिवाय या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणार नाही,” असा थेट आरोपही त्यांनी केला आहे.

कृष्णा आंधळे बेपत्ता, तो जिवंत आहे का?

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. 2023 मध्ये त्याच्यावर *हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता, मात्र त्याला अटक करण्यात आली नव्हती. धक्कादायक बाब म्हणजे, गेल्या चार वर्षांत धारूर, आंबेजोगाई आणि केज पोलीस ठाण्यांत त्याच्यावर खंडणी, मारहाण आणि खुनाच्या प्रयत्नासह तब्बल सहा गंभीर गुन्हे दाखल आहेत. इतके गंभीर गुन्हे करूनही तो मोकाट कसा फिरत होता? त्याला कोणाचा पाठिंबा होता? हे प्रश्न उपस्थित होत आहेत.

संदीप क्षीरसागर यांचा दावा – कृष्णा आंधळे जिवंत नसेल

संदीप क्षीरसागर यांनी सरकारवर थेट आरोप करत म्हटले आहे की – “बीड जिल्ह्यातील अनेक प्रकरणे आता उघडकीस येत आहेत. लोक अन्यायाविरोधात आवाज उठवत आहेत. कृष्णा आंधळे हा जिवंत नसेल, असा माझा संशय आहे. आणि जर तो जिवंत नसेल, तर हे सरकार त्याची जबाबदारी घेणार का?”

तसेच, “एखादा विषय अंगलट आला की संबंधित व्यक्ती अचानक गायब होते. त्यामुळे मला वाटत नाही की कृष्णा आंधळे कधी सापडेल,” असे त्यांनी सूचक वक्तव्य केले आहे.

राजीनाम्याशिवाय निष्पक्ष चौकशी शक्य नाही – क्षीरसागर

संदीप क्षीरसागर यांनी ठाम भूमिका घेत, “प्रशासनाला मोकळेपणाने तपास करायचा असेल, तर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे,” असे म्हटले आहे.

ते पुढे म्हणाले, “जर कोणाला पकडायचे ठरवले तर तो २४ तासांत सापडतो. मात्र, कृष्णा आंधळे अद्याप फरार आहे. याचा अर्थ त्याच्या जीवाला धोका असेल, किंवा त्याच्यावर काहीतरी मोठं घडलं असावं.” या वक्तव्यामुळे या प्रकरणाला नवा कल मिळाला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर पोलीस तपास वेगवान

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर या प्रकरणाचा तपास गतीने सुरू करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणामुळे बीड जिल्ह्याच्या पोलिस अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तपासात उशीर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार असल्याचे संकेत सरकारकडून मिळाले आहेत.

बीडमध्ये जनक्षोभ, निष्पक्ष चौकशीची मागणी

संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर बीडमध्ये नागरिक मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले आहेत. अन्याय झालेल्या लोकांनी उघडपणे आवाज उठवायला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर, धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी अधिक तीव्र होत चालली आहे, आणि या प्रकरणात पुढे काय घडते याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.