Jalgaon : महाराष्ट्रात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण चिंताजनक बनले आहे. दिवसाढवळ्या घडणाऱ्या हत्या, लैंगिक अत्याचार, मारामाऱ्या, आणि गुंडगिरीच्या अनेक घटनांनी राज्य हादरले आहे. अशाच एका भयंकर घटनेत जळगाव शहरातील पिंप्राळा हुडको परिसरात रविवारी एका युवकाची हत्या करण्यात आली.
पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह केल्याचा राग मनात ठेवून सासरच्या मंडळींनी त्याला ठार मारले. या घटनेने शहरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. मुकेश रमेश शिरसाठ या युवकाने पूजा नावाच्या मुलीशी पळून जाऊन विवाह केला होता. त्याच्या सासरच्या मंडळींनी कोयता आणि चोपरने हल्ला करून मुकेशची हत्या केली.
हल्ल्याच्या वेळी मध्ये पडलेल्या मुकेशच्या कुटुंबातील सात जणांनाही गंभीर जखमी करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि सात जणांवर गुन्हा दाखल करून सहा जणांना अटक करण्यात आली. ही घटना जळगावमध्ये सैराट चित्रपटाची पुनरावृत्ती असल्याची चर्चा सुरू आहे.
मुकेशच्या मृत्यूनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला आहे. स्थानिक रहिवाशांनी या क्रूर घटनेचा निषेध व्यक्त केला असून संपूर्ण गाव सुन्न झाले आहे. मुकेशच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सासरच्या मंडळींनी प्रेमविवाहाचा सूड घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.