ताज्या बातम्याक्राईमराज्य

Chitradurga : ST ड्रायव्हरला कर्नाटकात मारहाण, संपुर्ण राज्यात संतापाचा आगडोंब; फडणवीस सरकारने घेतला धाडसी निर्णय

Chitradurga : कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) चालकांवर काही समाजकंटकांनी हल्ला करून त्यांना काळं फासल्याची संतापजनक घटना घडली आहे. या प्रकाराची महाराष्ट्र सरकारने गंभीर दखल घेतली असून, सुरक्षेच्या कारणास्तव महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

राज्य सरकारची तत्काळ कारवाई
या घटनेनंतर ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेत पुण्यात कर्नाटकच्या बसेसना काळं फासलं आणि त्यांच्यावर हल्ल्याचा इशारा दिला. वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटकात जाणाऱ्या कोल्हापूर विभागातील एसटी बसेस पुढील अनिश्चित काळासाठी तातडीने बंद करण्याचे आदेश दिले. तसेच, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व प्रभारी व्यवस्थापकीय संचालक विवेक भीमनवार यांनीही हा निर्णय अंमलात आणण्याचे निर्देश दिले आहेत.

जखमी चालकांशी सरकारचा संपर्क
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी या घटनेत जखमी झालेल्या चालक भास्कर जाधव यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधून त्यांना धीर दिला. तसेच, महाराष्ट्र सरकार त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं असल्याची ग्वाही दिली. जोपर्यंत कर्नाटक सरकार या घटनेबाबत ठोस भूमिका घेत नाही आणि महाराष्ट्र सरकारसोबत चर्चा करत नाही, तोपर्यंत कर्नाटकात जाणाऱ्या बसेस बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नेमकं काय घडलं?
२१ फेब्रुवारीच्या रात्री सव्वा नऊच्या सुमारास, मुंबई आगाराची बस (MH14 K Q 7714) बंगळुरूहून मुंबईकडे येत असताना चित्रदुर्गच्या जवळील दोन किलोमीटर अंतरावर काही स्थानिक कार्यकर्त्यांनी बस अडवून चालक भास्कर जाधव यांना मारहाण केली आणि काळं फासलं. या घटनेनंतर वरिष्ठांच्या आदेशानुसार, संबंधित चालकाने स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

आज सकाळी कोल्हापूर विभाग नियंत्रकांनी चालक, वाहक आणि बस यांना सुरक्षितपणे कोल्हापूर येथे परत आणले. सीमावर्ती भागातील वाढता तणाव पाहता, महाराष्ट्र सरकारने प्रवाशांच्या आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेतला आहे.

ही घटना महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादाच्या पार्श्वभूमीवर घडल्याने, पुढील घडामोडींवर सर्वांचं लक्ष आहे.

Related Articles

Back to top button