Manoj Jarange : सर्वात मोठी बातमी! मनोज जरांगेंचे उपोषण स्थगित, राज्य सरकारने दिली ‘ही’ 5 आश्वासनं

Manoj Jarange : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी अखेर सहाव्या दिवशी उपोषण स्थगित करण्याची घोषणा केली. गेल्या पाच दिवसांपासून ते आंदोलन करत होते, आणि त्यांच्या उपोषणाची राज्यभरात मोठी दखल घेतली जात होती.

आज राज्य सरकारतर्फे भाजप आमदार सुरेश धस यांनी जरांगे यांची भेट घेतली आणि चर्चा करून त्यांना उपोषण सोडण्यास राजी केले. सरकारकडून काही ठोस आश्वासनं मिळाल्यानंतर मनोज जरांगे यांनी उपोषण मागे घेतलं, मात्र सरकारने जर दिलेली आश्वासनं पाळली नाहीत, तर यापुढे उपोषण नाही, थेट लढाई होईल, असा इशारा त्यांनी दिला.

राज्य सरकारने मराठा आरक्षण आणि आंदोलकांवरील कारवाई संदर्भात काही महत्त्वाची आश्वासनं दिली आहेत –

  1. निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नेतृत्वाखालील समितीला एक वर्षाची मुदतवाढ देण्याची प्रक्रिया सुरू.
  2. हैदराबाद गॅझेटचा तपास करून शिंदे समिती अहवाल तयार करणार, त्यानंतर आवश्यक ती कारवाई केली जाईल.
  3. मराठा आंदोलकांवरील गुन्ह्यांचा तपास करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेतले जातील.
  4. कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया वेगवान करण्यासाठी जिल्हा व तालुका स्तरावर कक्ष स्थापन करण्यात येणार.

मनोज जरांगे पाटील यांनी मांडलेल्या प्रमुख मागण्या

  1. हैदराबाद गॅझेटनुसार मराठा समाजाला सरसकट आरक्षण लागू करावे आणि शिंदे समितीने संपूर्ण राज्यभरातील पुरावे गोळा करून निर्णय घ्यावा.
  2. मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.
  3. वंशावळ तपासणी प्रक्रिया वेगवान करण्यासाठी अधिकाऱ्यांची जबाबदारी ठरवावी. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी.
  4. वंशावळ समिती पुन्हा सुरू करावी, त्यासाठी पुरेसा निधी आणि मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावे.
  5. मोडी लिपी अभ्यासकांना अधिकार द्यावेत, जेणेकरून पुरातत्व अभिलेखांमधून मराठा समाजाच्या ऐतिहासिक नोंदी शोधता येतील.
  6. मराठा विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षण आणि शिष्यवृत्ती प्रक्रियेत सुसूत्रता आणावी.
  7. एडब्ल्यूएस कोट्यातून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची हमी द्यावी.

आंदोलनाची पुढील दिशा

मनोज जरांगे यांनी उपोषण स्थगित केलं असलं तरी, राज्य सरकारने जर आश्वासनं पाळली नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र होईल, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. यापुढे उपोषण नाही, तर थेट संघर्ष होईल, असं त्यांनी ठामपणे सांगितलं. मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढाई सुरूच राहील, असंही त्यांनी नमूद केलं.