Nitesh Rane : राज्यात धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांमध्ये आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. जय श्रीराम बोलण्यास नकार दिल्याने एका मुस्लिम कुटुंबाला मारहाण करण्यात आल्याचा आरोप नितेश राणे यांच्या समर्थकांवर करण्यात आला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर प्रकरण चव्हाट्यावर आले.
पीडित कुटुंबाने केली मुख्यमंत्री भेटण्याचा प्रयत्न, पोलिसांनी घेतलं ताब्यात
पीडित आसिफ शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना अडवून पोलिसांनी ताब्यात घेतले. शेख कुटुंबाने नितेश राणे यांच्या राजीनाम्याची तसेच मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
कुटुंबाचा गंभीर आरोप – “चार वर्षीय मुलीवर चहा फेकला”
पीडित आसिफ शेख यांनी सांगितले की, “फक्त जय श्रीराम न बोलल्याने आम्हाला मारहाण करण्यात आली. माझ्या चार वर्षांच्या मुलीवर गरम चहा फेकण्यात आला.” पुढे ते म्हणाले, “आम्ही या घटनेची तक्रार मुख्यमंत्र्यांकडे करायचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी आम्हाला पनवेल रेल्वे स्टेशनला नेले आणि कोणतेही सहकार्य दिले नाही.”
राजकीय वाद वाढला, नितेश राणे यांच्या विधानावरून संताप
राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे हे त्यांच्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतात. अलीकडेच त्यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात मुस्लिम नव्हते आणि स्वराज्याची लढाई हिंदू विरुद्ध मुस्लिम होती” असे वादग्रस्त वक्तव्य केले. यावर काँग्रेसने तीव्र आक्षेप घेत जितेंद्र आव्हाड यांनी शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम अधिकाऱ्यांची यादी सादर करत राणेंना चोख प्रत्युत्तर दिले.
कॉंग्रेसकडून राजीनाम्याची मागणी
राणे यांच्या विधानावर आणि मुस्लिम कुटुंबावर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, धार्मिक तेढ निर्माण करणाऱ्या घटनांबाबत सरकारची भूमिका काय असेल, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.