Satish Bhosale : सुरेश धसांचा कार्यकर्ता खोक्याभाईच्या अडचणी वाढल्या, आता लॉरेन्स बिश्नोईकडून धमकी? म्हणाला..

Satish Bhosale : भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता सतीश उर्फ खोक्या भोसले कायद्याच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. वन विभागाने त्याच्या घराची झडती घेतली असता मोठ्या प्रमाणावर आक्षेपार्ह वस्तू सापडल्या. शिकारीसाठी वापरण्यात येणारी धारदार शस्त्रं, जनावरांचे मांस, जाळी आणि वाघूर असे साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे. विशेष म्हणजे मोर आणि हरिणाच्या शिकारीसाठी वापरली जाणारी जाळी देखील त्याच्या घरातून सापडली आहे, त्यामुळे खोक्याच्या अडचणी वाढू शकतात.

फेसबुकवरून खोक्याला धमकी

मारहाण करतानाचा व्हिडीओ समोर आल्यानंतर सतीश भोसले प्रकरणाने राज्यात मोठा गदारोळ निर्माण केला आहे. याच पार्श्वभूमीवर लॉरेन्स बिश्नोई नावाच्या एका फेसबुक अकाउंटवरून खोक्याला धमकी देण्यात आली आहे.

या पोस्टमध्ये लिहिलं आहे की,
“मी त्याला शिक्षा देईलच, पण तुम्हीही (बीड पोलीस) त्याला आत टाका. हरिण आमचं दैवत आहे, त्यामुळे खोक्या माफीच्या लायकीचा नाही. लवकरात लवकर जेलमध्ये टाका.”

खोक्या फरार, शिरूर बंदची हाक

सतीश भोसलेने शिकारीवरून बापलेकाला मारहाण केल्याचं प्रकरणही उघडकीस आलं आहे. त्याच्याविरोधात शिरूरमधील बावी गावचे ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. खोक्याच्या विरोधात जोरदार कारवाईची मागणी होत आहे. या प्रकरणाचे पडसाद संपूर्ण शिरूर तालुक्यात उमटत असून, उद्या शिरूर बंदची हाक देण्यात आली आहे.

पोलिसांचा शोध सुरू

सध्या सतीश उर्फ खोक्या भोसले फरार आहे. पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला असून, लवकरच त्याला अटक होण्याची शक्यता आहे. वन्यजीव संरक्षण कायद्याअंतर्गत त्याच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.