Santosh Deshmukh : संतोष देशमुखांचं पोस्टमार्टम करणाऱ्या डाॅक्टरवर गंभीर आरोप; वेगळंच कनेक्शन समोर आल्याने उडाली खळबळ

Santosh Deshmukh : संतोष देशमुख हत्या प्रकरणाला रोज नवे वळण मिळत असून, या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडला मिळणाऱ्या सुविधांवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दमानिया यांनी आता बीडच्या सिव्हिल सर्जन डॉ. अशोक थोरात यांच्यावर थेट आरोप करत चौकशीची मागणी केली आहे.

दमानिया यांनी ‘एक्स’ या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत अंबेजोगाईतील ‘हॉटेल पियुष इन’च्या मालकीबाबत प्रश्न उपस्थित केला आहे. “मला अशी माहिती मिळाली आहे की हे हॉटेल डॉ. अशोक थोरात यांचं आहे, जे सध्या बीडच्या जिल्हा रुग्णालयात सिव्हिल सर्जन आहेत,” असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच, “पूर्वी नाशिकला असलेले डॉ. थोरात एका मोठ्या व्यक्तीच्या आशीर्वादाने बीडला बदली झाले,” असाही दावा त्यांनी केला आहे.

डॉ. अशोक थोरात यांचे स्पष्टीकरण

या आरोपांबाबत प्रतिक्रिया देताना डॉ. अशोक थोरात म्हणाले, “मी २१ तारखेपासून ३१ तारखेपर्यंत रीतसर रजेवर आहे. माझा आणि वाल्मिक कराड यांच्या उपचारांचा काहीही संबंध नाही.”

दरम्यान, अंजली दमानिया यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरून ‘हॉटेल पियुष इन’च्या मालकीचा तपास होणे गरजेचे आहे. तसेच डॉ. थोरात यांचा या प्रकरणाशी संबंध आहे का, हे स्पष्ट होणे महत्त्वाचे आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरण आणि आरोपी वाल्मिक कराड याच्याशी संबंधित हे नवे आरोप सध्या चर्चेचा विषय बनले आहेत. पुढील चौकशीमध्ये या प्रकरणाला आणखी कोणते नवे पैलू उलगडतील, याकडे सर्वांचे लक्ष आहे.