BJP : राजकारणात कोणत्या क्षणी काय घडेल, हे सांगणे अवघड असते. मागील पाच वर्षांत राज्याच्या राजकारणात अनेक अनपेक्षित घडामोडी घडल्या आहेत. अशा परिस्थितीत प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी एक धक्कादायक दावा केला आहे, ज्यामुळे राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू झाली आहे.
बच्चू कडू यांनी देशात मोठ्या उलथापालथीचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे लवकरच भाजपसोबत केंद्रात जाण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून, राज्याच्या राजकारणात आणि विशेषतः महाविकास आघाडीत काही मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारखे नेते काही महत्त्वाची विधेयके मंजूर करण्यासाठी भाजपसोबत राहिले होते, हे उदाहरण देत कडू यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला केंद्रात महत्त्वाची भूमिका मिळण्याची शक्यता व्यक्त केली. भाजपसाठी शिंदे आणि अजित पवार यांची भूमिका संपल्याचे सांगत कडू यांनी भाजपाच्या धोरणांवरही जोरदार टीका केली.
कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर टोलाही लगावत कडू म्हणाले की, मंत्र्यांनी भ्रष्टाचाराबाबत उघडपणे बोलल्यास त्यांचे अभिनंदन केले पाहिजे. एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत कडूंनी म्हटले की, जेव्हा ते नाराज असतात, तेव्हा ते आतून आनंदी असतात आणि जेव्हा ते जास्त आनंदी असतात, तेव्हा ते नाराज असतात.