Uddhav Thackeray : दिल्लीत चर्चा ऑपरेशन टायगरची…पण शिंदेंनी गेम केला संभाजीनगरमध्ये; ठाकरे गटाला भगदाड

Uddhav Thackeray : राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय हालचालींना वेग आला आहे. विशेषतः शिवसेनेच्या दोन्ही गटांमध्ये जोरदार राजकीय धामधूम सुरू आहे. अशातच, एकनाथ शिंदे गटाकडून राबवण्यात येणाऱ्या “ऑपरेशन टायगर” मोहिमेने राजकीय चर्चांना उधाण आणले आहे.

संभाजीनगरमध्ये उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला असून, त्यांचे 10 माजी नगरसेवक शिंदे गटात जाण्याच्या तयारीत आहेत. हे सर्व नगरसेवक मुंबईच्या दिशेने रवाना झाले असून, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांचा अधिकृत प्रवेश होणार आहे. ही हालचाल स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी मोठी राजकीय घडामोड मानली जात आहे.

दरम्यान, ठाकरे गटाच्या सहा खासदारांच्या शिंदे गटात प्रवेशाच्या चर्चांना जोर आला होता. मात्र, या खासदारांनी एकत्र येऊन आपली भूमिका स्पष्ट केली. “आमची वज्रमूठ कायम असून आम्ही शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षासोबतच राहणार,” असे खासदार अरविंद सावंत यांनी सांगितले. त्यांनी “ही बातमी पायाखालची वाळू सरकल्याने पसरवली जात आहे,” असा आरोप केला आहे.

यासंदर्भात बोलताना पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. “त्यांच्याकडे कोणीही राहायला तयार नाही. मानसिकता नसल्याने नगरसेवक शिंदे गटात प्रवेश करत आहेत,” असे त्यांनी सांगितले. तसेच, संजय राऊत यांच्यामुळे पक्ष ढासळत असल्याचा आरोपही त्यांनी केला. “पक्ष खड्ड्यात गेला तरी बदल करण्याची त्यांची तयारी नाही,” असे शिरसाठ म्हणाले.

या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्यांनी स्पष्ट भूमिका घेतली आहे. “आमचं हिंदुत्व बावनकशी आहे. पक्ष सोडून गेलेले नेते ईडीच्या दबावाखाली गेले आहेत,” असे अरविंद सावंत यांनी म्हटले आहे. त्यामुळे आगामी काळात शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.