Shiv Sena : गेल्या काही दिवसांपासून उद्धव ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या एकत्रीकरणाची चर्चा रंगली आहे. भाजपसोबत पुन्हा महायुती स्थापन होण्याच्या शक्यतेबाबत विविध नेत्यांकडून वक्तव्ये केली जात आहेत. या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनीही दोन्ही गटांच्या एकत्र येण्याबाबत सकारात्मक संकेत दिले होते. मात्र, भाजपाचे खासदार नारायण राणे यांनी या चर्चांना पूर्णतः फेटाळले आहे.
राणे यांनी संजय राऊतांवर साधला निशाणा
या चर्चांवर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी संजय राऊतांवर जोरदार टीका केली. “संजय राऊत ज्या बातम्या देतात त्या अनेकदा दिशाभूल करणाऱ्या असतात. त्यांना चांगले दिसत नाही, त्यामुळेच ते असे शब्द वापरतात. त्यांना एक दिवस चांगले बोलायला शिकवू,” असा टोला राणे यांनी लगावला. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करताना, “एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री म्हणून चांगले काम करत आहेत. काही काळ ते शांत होते, पण आता पुन्हा कामाला लागले आहेत,” असेही राणे म्हणाले.
“दोन शिवसेना एकत्र येणे अशक्य” – राणे
शिरसाट यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना नारायण राणे यांनी स्पष्टपणे सांगितले की, दोन्ही शिवसेना गट पुन्हा एकत्र येऊ शकत नाहीत. “माझ्या मते, दोन्ही गटांच्या एकत्रीकरणाची शक्यता नाही. या चर्चांना काहीही अर्थ नाही,” असे राणे म्हणाले.
शिरसाट यांची अपेक्षा
शिंदे गटाचे आमदार आणि प्रवक्ता संजय शिरसाट यांनी काही दिवसांपूर्वीच दोन्ही शिवसेना गट एकत्र यावेत अशी इच्छा व्यक्त केली होती. “दोन शिवसेना गट पुन्हा एकत्र यावेत, अशी भावना कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची आहे. आजही आम्ही एकमेकांच्या सुख-दुःखात सहभागी होतो. अशा परिस्थितीत ज्येष्ठ नेत्यांनी पुढाकार घेतला पाहिजे,” असे शिरसाट यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितले होते.
दरम्यान, या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे आणि शिवसेना गटांचे खरोखर एकत्रीकरण होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.