Team India : टिम इंडीया पाचव्या टी-२० सामन्यात ‘या’ दोन हुकमी एक्क्यांना देणार विश्रांती, पाहा कोणाची होणार एन्ट्री?

Team India : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाचवा आणि अंतिम टी-२० सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर आज पार पडणार आहे. भारतीय संघाने पुण्यात चौथा सामना जिंकत मालिका आपल्या नावावर केली आहे. मात्र, इंग्लंड संघ गमावलेल्या मालिकेचा गोड शेवट करण्यासाठी शेवटचा सामना जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसरीकडे, टीम इंडिया विजयाची मालिका कायम ठेवण्यासाठी सज्ज आहे.
संभाव्य बदल आणि विश्रांती मिळणारे खेळाडू
आजच्या सामन्यात भारतीय संघात काही बदल होण्याची शक्यता आहे. प्रमुख वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंह याला विश्रांती देण्यात येऊ शकते आणि त्याच्या जागी अनुभवी मोहम्मद शमी संघात परतण्याची शक्यता आहे. तसेच, हार्दिक पंड्यालाही विश्रांती दिली जाऊ शकते. त्याच्या जागी रमनदीप सिंहला संघात स्थान मिळण्याची शक्यता आहे.
तसेच, यष्टीरक्षक फलंदाज ध्रुव जुरेललाही संधी मिळू शकते. हर्षित राणा आणि शिवम दुबे यांनाही प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. दुबेने चौथ्या सामन्यात अर्धशतकी खेळी करत आपली क्षमता सिद्ध केली आहे. त्यामुळे त्याला संघात स्थान मिळण्याची शक्यता अधिक आहे.
हार्दिक पंड्याचा प्रभाव आणि संघाची ताकद
संपूर्ण मालिकेत हार्दिक पंड्या मॅचविनर खेळाडू ठरला आहे. विशेषतः राजकोटच्या सामन्यात, इतर फलंदाज अपयशी ठरले असताना, पंड्या शेवटपर्यंत लढला. जर त्याला शेवटपर्यंत साथ मिळाली असती, तर कदाचित निकाल वेगळा असता.
सामन्याची वेळ आणि संभाव्य भारतीय संघ. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरू होईल.
संभाव्य भारतीय प्लेइंग ११:
- अभिषेक शर्मा
- संजू सॅमसन (यष्टीरक्षक)
- सूर्यकुमार यादव (कर्णधार)
- तिलक वर्मा
- शिवम दुबे
- रिंकू सिंग
- अक्षर पटेल
- रवी बिश्नोई
- हर्षित राणा
- मोहम्मद शमी
- वरुण चक्रवर्ती
भारतीय संघ नव्या खेळाडूंना संधी देत मालिका मोठ्या विजयाने संपवण्याचा प्रयत्न करेल, तर इंग्लंड संघ मालिका ३-२ करण्यासाठी संपूर्ण ताकद लावेल.