Narayangaon : पुण्याजवळील नारायणगावात भीषण अपघात, ९ जणांचा जागीच मृत्यू, अपघाताची भीषणता वाचून अंगावर काटा येईल

Narayangaon : पुणे जिल्ह्यातील नारायणगाव येथे आज सकाळी एक भयंकर अपघात घडला. हरियाणा पासिंग आयशर ट्रकने वेगात येत मॅक्झिमा प्रवासी गाडीला मागून धडक दिली, ज्यामुळे मॅक्झिमा प्रवासी गाडी पुढे उभ्या असलेल्या एसटी बसवर जाऊन आदळली. या भीषण अपघातात नऊ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले, ज्यापैकी दोन जणांची प्रकृती चिंताजनक आहे.

मॅक्झिमा जीपमधील मृतांमध्ये चार पुरुष, चार महिला आणि एका पाच वर्षांच्या मुलाचा समावेश आहे. अपघातानंतर ट्रक चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

या दुर्घटनेत, नाशिककडून नारायणगावकडे(Narayangaon) येत असताना मॅक्झिमा जीपला आयशर ट्रकने जोरदार धडक दिली. या धडकेमुळे मॅक्झिमा जीप रस्त्याच्या खाली उतरून उभी असलेल्या नारायणगाव-महाबळेश्वर एसटी बसवर आदळली. बस बिघडल्यामुळे काही काळापासून खराब अवस्थेमुळे थांबली होती, पण बसचा इंडिकेटर सुरू नव्हता. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, ट्रकच्या जबरदस्त वेगामुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि हा अपघात घडला.

या अपघातातील मृतांची ओळख पटली असून त्यात देऊबाई टाकळकर, विनोद रोकडे, युवराज वाव्हळ, चंद्रकांत गुंजाळ, गीता गवारे, भाऊ बडे, नजमा शेख, वशिफा इनामदार आणि मनीषा पाचरणे यांचा समावेश आहे. अपघातानंतर ट्रकचालक घटनास्थळावरून फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

दरम्यान, हा अपघात काल चाकण-शिक्रापूर मार्गावर घडलेल्या अपघातासारखा असल्याचे दिसत आहे. या अपघातातही हरियाणातील कंटेनर चालक मद्यधुंद अवस्थेत होता. आजच्या अपघातातही हरियाणा पासिंग ट्रकच्या चालकाबाबतही संशय व्यक्त होत आहे, मात्र चालकाला पकडल्यानंतरच सत्य समोर येईल.

जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पुणे प्रशासनाने म्हटले आहे की, काही जखमींची प्रकृती गंभीर आहे. यामुळे मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

चालकाचा निष्काळजीपणा समोर आला
अपघाताची माहिती मिळताच आमदार शरद सोनवणे यांनीही घटनास्थळी पोहोचून अपघाताची माहिती घेतली. माध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, नारायणगावमध्ये हा दुर्दैवी अपघात घडला. हा एक अतिशय गंभीर अपघात आहे.

आमदार सोनवणे यांनी प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्याने सांगितले की, आयशरने प्रवासी वाहनाला धडक दिली आणि पळून गेला. पोलिसांनी आयशर जप्त केली आहे.

आमदार शरद सोनवणे म्हणाले की प्रथमदर्शी हा अपघात आयशर चालकाच्या चूकीमुळे झाला असे दिसते. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. चौकशीनंतरच आपल्याला खरोखर काय घडले हे कळू शकेल. गंभीर जखमींना वाचवण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.