Swargate rape case : पुणे: स्वारगेट एसटी बसस्थानक परिसरात घडलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला पुणे गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले आहे. त्याच्या इतर गुन्ह्यांची चौकशी सुरू असून, तो पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे समोर आले आहे.
गुन्हे शाखेची कसून चौकशी सुरू
स्वारगेट पोलिसांकडून आरोपीला गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले असून, लष्कर पोलीस ठाण्यात तीन तास कसून चौकशी करण्यात आली. मात्र, गाडे वारंवार टाळाटाळ करत पोलिसांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. सध्या तो लष्कर पोलीस ठाण्याच्या कोठडीत आहे.
पीडितेचा सवाल – “माझ्या बदनामीला जबाबदार कोण?”
या प्रकरणातील पीडितेने गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना थेट सवाल केला – “माझ्या बदनामीला जबाबदार कोण?” यावर अधिकारी निरुत्तर झाल्याचे दिसून आले. गुन्हे शाखेकडून तपास सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांनी पीडितेची भेट घेतली. यावेळी तिने विचारलेल्या प्रश्नावर कोणीच ठाम उत्तर देऊ शकले नाही.
मोबाईल जप्त करण्याचे पोलिसांसमोर आव्हान
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी स्वारगेट पोलिसांकडील तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्याचे आदेश दिल्यानंतर आरोपीचा मोबाईल शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. गाडेने आपला मोबाईल गुनाट गावातील उसाच्या शेतात लपवून ठेवल्याचे सांगितले जात आहे. त्याच्या मोबाईलमध्ये महिलांचे व्हिडीओ रेकॉर्डिंग आणि ब्लॅकमेलिंगचे पुरावे असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे मोबाईल जप्त करून त्याची सखोल तपासणी करणे अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
गाडेने यापूर्वीही अशा प्रकारची कृत्ये केल्याचा संशय
दि. २५ फेब्रुवारी रोजी आरोपी दत्तात्रय गाडे याने कंडक्टर असल्याचे सांगून पीडितेला स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये नेले आणि तिच्यावर बलात्कार केला. या घटनेनंतर राज्यात संतापाची लाट उसळली. पुणे पोलिसांनी दि. २८ फेब्रुवारीला पहाटे गाडेला त्याच्या गावातून अटक केली.
पोलिसांच्या माहितीनुसार, गाडेविरोधात सबळ पुरावे हाती लागले आहेत. यापूर्वीदेखील त्याने महिलांचे व्हिडीओ रेकॉर्ड करून त्यांना ब्लॅकमेल केल्याचा संशय असून, अशा प्रकरणांत पीडित महिलांनी पुढे येऊन गुन्हे शाखेकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
न्यायाची अपेक्षा!
स्वारगेट बलात्कार प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून, आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे. पोलिस तपास वेगाने सुरू असून, आरोपीला लवकरात लवकर कठोर शिक्षा मिळेल का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.