Tamil Nadu : तमिळनाडूमधील एका सराफा दुकानातून चोरी गेलेले एक किलो २०० ग्रॅम सोने बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील नांदूर घाट येथील सराफा व्यापाऱ्याला विकण्यात आले असल्याची माहिती तमिळनाडू पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे लातूरमधून दोघांना अटक करण्यात आली, त्यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून नांदूर घाट येथे छापा टाकण्यात आला.
पोलीस कारवाईत एक कोटींचे सोने जप्त, व्यापारी पसार
छाप्यादरम्यान चोरीतील एक किलो २०० ग्रॅम सोने हस्तगत करण्यात आले. मात्र, हे सोने खरेदी करणारा व्यापारी अनिल बडे घराच्या छतावरून उडी मारून फरार झाला.
सदर सोने सुमारे एक कोटी रुपयांचे असून, अनिल बडे याने ते अवघ्या २५ लाख रुपयांना खरेदी केले होते. त्यातील १४ लाख रुपये चोरट्यांना देण्यात आले होते, तर उर्वरित ११ लाख रुपये बाकी असताना पोलिसांना माहिती मिळाली.
तमिळनाडू पोलिसांचा सापळा आणि तपास
तमिळनाडू पोलिसांनी चोरीचा तपास करत लातूर येथून दोघांना अटक केली. चौकशीत त्यांनी चोरीचे सोने बीड जिल्ह्यातील अनिल बडे यांना विकल्याची कबुली दिली. त्यानंतर तमिळनाडू पोलिसांनी केज पोलिसांच्या मदतीने दोन दिवस नांदूर घाट येथे सापळा रचला.
पोलीस कारवाईत स्थानिक अधिकाऱ्यांची उपस्थिती
तमिळनाडू पोलिसांना मदत करण्यासाठी केज पोलीस ठाण्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आनंद शिंदे, नांदूर घाट चौकीचे पाशा शेख, राजू वंजारे, शमीम पाशा यांच्यासह इतर पोलीस कर्मचारी कारवाईसाठी उपस्थित होते.
सध्या अनिल बडे फरार असून, त्याचा शोध सुरू आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.