ladki bahin yojana : महाराष्ट्रात पुन्हा मोठा घोटाळा! गावात एकही मुस्लिम कुटुंब नसताना सापडले मुस्लिम महिलांचे अर्ज महाराष्ट्र सरकारच्या “मुख्यमंत्री लाडकी बहीण” योजनेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार उघडकीस आला आहे. परराज्यात राहणाऱ्या महिलांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अर्ज भरून अनुदान मिळवण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
लातूर आणि सांगली जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका असल्याचे भासवून उत्तर प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल आणि राजस्थानातील महिलांनी तब्बल 1,171 अर्ज भरले. हा घोटाळा उघड झाल्यानंतर संबंधितांना मिळणारे पैसे तातडीने रोखण्यात आले असून बार्शी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बोगस अर्ज कसे उघडकीस आले?
बार्शी तालुक्यात 22 संशयास्पद अर्ज मिळाल्यानंतर अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली. विशेष म्हणजे, अर्ज भरलेल्या काही गावांमध्ये एकही मुस्लिम कुटुंब नव्हते, तरीही मुस्लिम महिलांचे अर्ज आढळले. आधार क्रमांक आणि बँक खात्यांच्या आधारे तपासणी केल्यावर संबंधित खात्यांचे संबंध परराज्यांशी असल्याचे स्पष्ट झाले.
लॉगिन आयडीचा गैरवापर करून मोठा घोटाळा
सरकारी वेबसाईटवर लॉगिन आयडी तयार करण्याची सुविधा दिली होती. एका लॉगिन आयडीवर अनेक अर्ज भरण्याची सोय असल्यामुळे या गैरव्यवहाराला चालना मिळाली. “मुनमुन ठाकरे, अंगणवाडी सेविका, हजारवाडी, जि. सांगली”,”अनवरा बेगम, अंगणवाडी सेविका, बोरगाव बु., जि. लातूर” या दोन बनावट लॉगिन आयडीच्या माध्यमातून तब्बल 1,171 अर्ज भरले गेले. तपासणीमध्ये अशा नावाच्या कोणत्याही अंगणवाडी सेविका अस्तित्वात नसल्याचे स्पष्ट झाले.
बनावट कागदपत्रांचा वापर
या फसवणूक प्रकरणात परप्रांतीय ठगांनी बनावट आधार क्रमांक आणि अस्पष्ट दस्तऐवज अपलोड करून पडताळणी प्रक्रियेत गोंधळ निर्माण केला. त्यामुळे त्यांच्या अर्जांवरील माहिती तपासणे कठीण जात होते. याचाच फायदा घेत, ते सरकारी अनुदान लाटण्याचा प्रयत्न करत होते.
संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू
सध्या पोलीस, महसूल विभाग आणि महिला व बालविकास विभागाने याचा तपास सुरू केला असून परराज्यातील या बनावट अर्जदारांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यांच्या अटकेसाठीही प्रयत्न सुरू आहेत.
महाराष्ट्रात गेल्या अनेक वर्षांपासून मोठ्या प्रमाणात परप्रांतीय स्थायिक झाले आहेत. मात्र, दुसऱ्या राज्यांत राहून महाराष्ट्र सरकारच्या योजना गैरप्रकाराने हडपणाऱ्या टोळ्यांचा पर्दाफाश झाल्याने, इतर योजनांमध्येही अशाच प्रकारची फसवणूक झाली आहे का, हे शोधणे आता आवश्यक बनले आहे.