Nashik : नाशिकमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली असून घरात खेळताना विषारी औषध सेवन केल्याने दोन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आदित्य शिंदे असे या बालकाचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे कुटुंबासह संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली आहे.
खेळता खेळता चिमुकल्याने घेतले विषारी औषध
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१० मार्च) रात्री जेवणानंतर आदित्य घरात आजी-आई-वडिलांसमोर खेळत होता. खेळता खेळता त्याने घरातच ठेवलेल्या ‘मॉस्किटो रिपेलंट रीफिल’च्या बाटलीतील द्रव पदार्थ प्राशन केला. काही वेळाने त्याची तब्येत अचानक बिघडली आणि तो बेशुद्ध पडला. ही बाब लक्षात येताच पालकांनी तातडीने त्याला आडगावच्या वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असताना मंगळवारी (११ मार्च) त्याचा मृत्यू झाला, अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
महिनाभरात निष्काळजीपणामुळे तिसऱ्या बालकाचा मृत्यू
शहरात पालकांच्या निष्काळजीपणामुळे अल्पावधीत तीन चिमुकल्यांचे जीव गेले आहेत.
- जेलरोड परिसरातील घटना: चहा बनवणाऱ्या आईच्या कडेवर खेळणाऱ्या दीड वर्षांच्या ओरान मुसा शेख याच्या अंगावर उकळता चहा सांडल्याने त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
- पाणी साठवणाऱ्या हौदात बुडून मृत्यू: प्रांजल लहू माने (वय २ वर्षे, रा. विजयनगर, जेलरोड) या बालकाचा पाण्यात पडून मृत्यू झाला.
- विषारी औषध सेवन प्रकरण: आदित्य शिंदे याने चुकून विषारी औषध घेतल्याने आपला जीव गमावला.
सजग पालकत्वाची गरज!
या सतत घडणाऱ्या घटनांमुळे शहरभर हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस आणि आरोग्य विभागाने पालकांना अधिक सजग राहण्याचे आवाहन केले आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेसाठी घरात विषारी औषधे, गरम पदार्थ आणि पाण्याचे टाके यांसारख्या धोकादायक गोष्टींपासून योग्य काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सुजाण नागरिकांनी सांगितले.
म्हसरूळ पोलिसांनी या घटनेची अकस्मात मृत्यूची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.