---Advertisement---

Udayanraje Bhosale : मेलो तरी चालेल, पण याला खल्लास करणार; शिवरायांच्या अवमानानंतर उदयनराजेंचा इशारा

---Advertisement---

Udayanraje Bhosale : सातारा – छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार बेताल वक्तव्ये केली जात असल्याने भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. अशा व्यक्तींना कठोर शिक्षा व्हावी, यासाठी सरकारने तातडीने कायदा आणावा, अशी मागणी त्यांनी केली.

दहा वर्षांच्या शिक्षेचा कायदा करा
साताऱ्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना उदयनराजे भोसले म्हणाले, “महापुरुषांविषयी गरळ ओकणाऱ्यांना रोखण्यासाठी याच अधिवेशनात दहा वर्षांच्या शिक्षेचा कायदा करावा. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याविरोधात अपशब्द वापरणाऱ्या प्रशांत कोरटकरसारख्या विकृत मानसिकतेच्या लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे.”

सिनेमॅटिक लिबर्टीवर नियंत्रण हवे
चित्रपट, नाटके आणि वेबसीरिजमध्ये इतिहासाच्या विकृतीकरणास आळा घालण्यासाठी सिनेमॅटिक लिबर्टीवर कायदा करण्याची गरज असल्याचेही उदयनराजे भोसले यांनी नमूद केले. यासाठी एक विशेष समिती नेमावी आणि सत्य इतिहासच समोर यावा, अशी त्यांनी मागणी केली.

“अशा परिस्थितीला थांबवा, अन्यथा जनता संतापेल”
शिवरायांबद्दल अपशब्द बोलणाऱ्यांविरोधात सरकारने वेळीच पाऊल उचलावे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. “जर लोकांच्या भावनांचा पुरेसा आदर झाला नाही, तर एक दिवस अशी परिस्थिती येईल की लोक ‘मेलो तरी चालेल, पण याला खल्लास करणार!’ या मानसिकतेपर्यंत पोहोचतील,” असे गंभीर विधान त्यांनी केले.

“औरंगजेब हा लुटारू होता”
औरंगजेबच्या समाधीवर होणाऱ्या खर्चावरही उदयनराजेंनी सवाल उपस्थित केला. “औरंगजेब देव नव्हता, तो लुटारू आणि चोर होता. शिवाजी महाराजांनी धर्मस्थळांचे संरक्षण केले, मग अशा व्यक्तीच्या समाधीवर इतके खर्च करण्याची गरज काय?” असे त्यांनी ठणकावून सांगितले.

सरकार कठोर पावले उचलणार का?

उदयनराजे भोसले यांच्या या मागण्यांमुळे आता सरकार अशा वक्तव्यांना रोखण्यासाठी काय उपाययोजना करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---