Uddhav Thackeray : दापोली विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष संजय कदम यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवायांचा ठपका ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ही कारवाई केली असून, यासंदर्भात अधिकृत पत्रक जारी करण्यात आले आहे.
शिंदे गटात प्रवेशाची तयारी?
संजय कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांच्यासोबत मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय अंतिम झाल्याचे सांगितले जात आहे. काही दिवसांतच संजय कदम हे शिंदे गटात प्रवेश करणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात असतानाच, ठाकरे गटाने त्यांच्यावर तडकाफडकी कारवाई केली.
संजय कदम यांचा राजकीय प्रवास
संजय कदम यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून केली होती. मात्र, पक्षांतर्गत वादानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल झाले आणि आमदार म्हणून निवडून आले. पुढे शिवसेनेत फूट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांनी त्यांच्यावर उत्तर रत्नागिरी जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी सोपवली होती. 2024 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी “मशाल” चिन्हावर लढत दिली, मात्र आमदार योगेश कदम यांच्या विरोधात २५,००० मतांनी पराभूत झाले.
कदम विरुद्ध कदम संघर्ष संपणार?
दापोली विधानसभा मतदारसंघात गेल्या आठ वर्षांपासून कदम विरुद्ध कदम असा राजकीय संघर्ष रंगलेला आहे. रामदास कदम आणि संजय कदम यांच्यातील वाद अनेकदा टोकाला गेला होता. मात्र, संजय कदम यांच्या संभाव्य शिंदे गट प्रवेशामुळे हा संघर्ष आता निवळण्याची शक्यता आहे.
शिमगोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आणि उन्हाच्या कडाक्यात दापोलीचे राजकारण तापले असताना, संजय कदम यांच्या निर्णयामुळे पुढील राजकीय समीकरणे कशी बदलतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.