दाखवण्याच्या लायकीची सुद्धा नाहीत! सासऱ्याने दिलेल्या भेटवस्तू पाहून UPSCवाला संतापला अन्…

UPSC : यूपीएससीची तयारी करणाऱ्या एका तरुणाने लग्नाआधी त्याच्या होणाऱ्या सासऱ्याकडून मिळालेल्या भेटवस्तूंबद्दल नाखुषी व्यक्त केल्याने वाद निर्माण झाला. या वादामुळे होणाऱ्या पत्नीने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणातील व्हॉट्सऍप चॅटचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामुळे यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत.

घटनेनुसार, तरुणाला मुलीच्या कुटुंबाकडून मिळालेल्या भेटवस्तू आवडल्या नाहीत. त्याने या भेटवस्तूंबद्दल होणाऱ्या पत्नीशी वाद घातला आणि त्या भेटवस्तूंना “तोलामोलाच्या नाहीत” आणि “शोभणाऱ्या नाहीत” असे टिप्पणी केली. व्हॉट्सऍपवरील चॅटमध्ये तरुणाने होणाऱ्या पत्नीला ब्लॉक करण्यास सांगितले.

त्याने म्हटले, “माझा नंबर ब्लॉक कर. मला आता तुझ्याशी बोलायचं नाही. हे सामान काय विचार करून पाठवलं होतं?” यावर मुलीने उत्तर दिले, “आम्ही पाठवलेल्या सामानाबद्दल काही तक्रार आहे का? त्यात काही त्रुटी आहे? असल्यास वडिलांना सांग.”

तरुणाने पुन्हा प्रतिक्रिया देताना म्हटले, “त्यापेक्षा काहीच द्यायला नको होतं. मी या वस्तू माझ्या हिशोबानं घेतल्या असत्या. आता या वस्तूंनी जागा व्यापून टाकलीय आणि त्या कोणाला दाखवण्याच्याही लायकीच्या नाहीत. मी तुझ्या बाबांशीच बोलतो. पुढे काहीही पाठवू नका.” या वादानंतर मुलीच्या कुटुंबाने लग्न मोडण्याचा निर्णय घेतला.

रेडिटवर एका यूजरने या प्रकरणाचा स्क्रीनशॉट शेअर केला. त्यानुसार, वाद घालणारा तरुण शिक्षक आहे आणि यूपीएससीची तयारी करत आहे, तर मुलगी सरकारी नोकरीत आहे. या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. अनेकांनी मुलीच्या कुटुंबाच्या निर्णयाचे कौतुक केले आहे. काही टिप्पण्यांमध्ये असे म्हटले आहे की, “अशा कुटुंबात मुलगी न दिलेलीच बरी.” या प्रकरणामुळे लग्नापूर्वीच्या वर्तनाविषयी आणि कुटुंबांमधील संबंधांविषयी चर्चा सुरू झाली आहे.