Valmik Karad : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात (Santosh Deshmukh Murder Case) पाच गोपनीय साक्षीदारांचे जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. तसेच, वाल्मिक कराड, विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांच्या टोळीची गावात किती दहशत आहे, हेही या जबाबांमधून स्पष्ट झाले आहे.
खंडणीसाठी टोळी तयार केली!
एका गोपनीय साक्षीदाराने दिलेल्या जबाबानुसार, प्रतीक घुले (Pratik Ghule) आणि सुधीर सांगळे (Sudhir Sangle) हे सुदर्शन घुले (Sudharshan Ghule) यास भाऊ मानत होते आणि त्याला ‘भावा’ म्हणून संबोधत असत. तिघांची गावात मोठी दहशत होती आणि ते वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी गोळा करण्याचे काम करीत असत.
गोपनीय साक्षीदाराचा जबाब:
गोपनीय साक्षीदाराने स्पष्ट केले की,
“मी गावात राहणाऱ्या सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे यांना ओळखतो. प्रतीक घुले रिक्षा चालवत असे, तर सुधीर सांगळे याचे हॉटेल गंगमाऊली साखर कारखान्याजवळ होते. सुदर्शन घुले हा साखर कारखान्यावर मुकादम म्हणून काम करीत असे. हे तिघेही गावात आणि परिसरात मोठी दहशत निर्माण करून ठेवत होते आणि वाल्मिक कराडच्या सांगण्यावरून खंडणी वसूल करत होते.”
वाल्मिक कराडने टोळ्या तयार करून दहशत निर्माण केली!
दुसऱ्या एका गोपनीय साक्षीदाराच्या जबाबात वाल्मिक कराडने जिल्ह्यात वर्चस्व राखण्यासाठी अनेक टोळ्या तयार केल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच्या टोळीच्या माध्यमातून तो विविध कंपन्यांकडून खंडणी मागत असे. जो खंडणी द्यायला नकार देई, त्याच्यावर हल्ले केले जात. काही जणांचे अपहरण करून त्यांना मारहाण केली जात असे, जेणेकरून इतरांमध्ये दहशत निर्माण होईल.
वाल्मिक कराडला अटक होताच आंदोलन!
वाल्मिक कराडला अटक झाल्यानंतर ठिकठिकाणी आंदोलन छेडण्यात आले. मात्र, तपासातून असे समोर आले की ही आंदोलने त्याच्या टोळीतील लोकांकडूनच घडवली गेली होती. या टोळीच्या दहशतीमुळे कोणीही पोलिस ठाण्यात जाऊन तक्रार करण्यास धजावत नव्हते. जर कोणी तक्रार करण्याचा प्रयत्न केला, तरी पोलिसांकडून तक्रार नोंदवली जात नव्हती.
गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी
या धक्कादायक प्रकारामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. स्थानिक नागरिक आणि राजकीय वर्तुळातूनही या गुन्हेगारी टोळीला संपवण्याची गरज असल्याचे मत मांडले जात आहे