Valmik Karad : केज तालुक्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात अटकेत असलेल्या वाल्मिक कराडचा आणखी एक ऑडिओ कॉल सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या क्लिपमध्ये कराडने पोलिस अधिकाऱ्यांसोबत सहजतेने संवाद साधत दबदबा दाखवण्याचा प्रयत्न केल्याचे स्पष्ट होते. सायबर शाखेच्या अधिकारी निशिगंधा खुळे यांच्यासोबतच्या या संभाषणाचा ऑडिओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे.
व्हायरल ऑडिओ क्लिपमधील संवाद
व्हायरल झालेल्या ऑडिओ क्लिपमध्ये वाल्मिक कराड आणि सायबर शाखेच्या महिला अधिकारी निशिगंधा खुळे यांच्यातील संवाद ऐकायला मिळतो.
कराड: ताई, वाल्मिक कराड बोलतोय…,
खुळे: हा, बोला ना…
कराड: ते काय पोरं करतात. चिल्लर आहेत पोरं. बाई, या पोस्ट डिलीट करून टाका तुम्ही.
खुळे: हो ना, वातावरण खराब होतं ना त्यानं.
कराड: सुरुवात त्यांनी केली. आम्ही शांत आहोत. कोणाच्या अरेला कारे करत नाहीत.
याच संभाषणादरम्यान एका पुरुषाचा आवाज येतो आणि कराड त्याच्यासोबत बोलताना ‘बाप बसलाय इथे’ असा उल्लेख करतो. कराड: इग्नोर करायचं, एवढं काय मनावर घ्यायचं नाही. इथे बाप बसलेले आहोत आपण. काय घाबरता?
पुरुष: तुम्ही आहात म्हणून दम धरलाय मी…
कराड: सोडून द्यायचं. तुमच्यासमोर बोललो ना मी स्पीकर ऑन करून…
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांची प्रतिक्रिया
या ऑडिओ क्लिपवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी संताप व्यक्त केला. त्यांनी म्हटले की, “मी ही क्लिप सुरुवातीपासून ऐकली. कराडला आधी एका व्यक्तीचा फोन आला, तो म्हणाला, ‘मी नाशिकवरून बोलतोय, पोलीस माझ्या मागे लागले आहेत’. त्यानंतर कराडने फोन होल्डवर ठेवून निशिगंधा खुळे यांना फोन केला आणि अगदी सहजतेने, हसत-खेळत संवाद साधला. काही वेळानंतर तो पुन्हा त्या व्यक्तीशी बोलून म्हणतो, ‘बघितलं ना, ऐकलं ना, कसं केलंय मी, बाप बसलोय आपण’.”
त्याचबरोबर पोलीस यंत्रणेवर कडाडून टीका करत दमानिया म्हणाल्या – “पोलीस अधिकारी पोलिसांसारखे कधी वागणार? राजकीय दबावाखाली काम करणे कधी थांबणार? संपूर्ण यंत्रणेवर कराडसारख्या लोकांचा दबाव असतो. सामान्य माणसाला पोलिस ठाण्यात न्याय मिळेल याची शक्यता नाही. आज गुंड प्रवृत्तीचे लोक आणि पोलिसांना पैसे खायला घालणाऱ्यांचा शब्द चालतो,” असा घणाघात त्यांनी केला.
पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह
या प्रकरणामुळे पोलीस आणि गुन्हेगारी विश्वातील संबंधांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वाल्मिक कराड पोलिसांसमोर एवढा निर्धास्तपणे संवाद का साधतोय? त्याला कोणाचा पाठिंबा आहे? पोलीस यंत्रणा अशा गुन्हेगारांना मोकळे रान का देत आहे?
या ऑडिओ क्लिपमुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवे वळण येण्याची शक्यता असून पोलिसांची भूमिका अधिक संशयास्पद ठरत आहे. यावर सरकार आणि प्रशासन काय भूमिका घेते, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.