Swargate : स्वारगेट अत्याचार प्रकरणातील आरोपीबाबत अत्यंत धक्कादायक माहिती आली समोर
Swargate : स्वारगेट बस स्थानकावर झालेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे हा सराईत गुन्हेगार असल्याचे तपासादरम्यान उघडकीस आले आहे. तो एसटी आणि पीएमपी बस स्थानकांवर फिरत महिलांना जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करत होता. विशेष म्हणजे, तो आपण पोलिस असल्याचे भासवत महिलांना फसवत असे, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
याशिवाय, तो एका प्रमुख राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्ता असल्याचे उघड झाले असून, त्याच्या संपर्कात काही राजकीय व्यक्ती आणि पोलिस अधिकारी असल्याचा संशय पोलिसांना आहे. सध्या त्याच्या संपर्कातील लोकांची चौकशी सुरू आहे.
गाडेवर आधीपासूनच संशय, महिलांची छेडछाड करत असल्याची माहिती
दत्तात्रय रामदास गाडे (वय ३७, रा. गुनाट, ता. शिरूर) याने यापूर्वीही काही महिलांना त्रास दिल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिसांच्या मते, तो नेहमीच स्वारगेट एसटी स्टँडवर उपस्थित असायचा आणि तिथली संपूर्ण माहिती त्याला ठाऊक होती. याचाच फायदा घेत त्याने पीडित तरुणीला निर्जनस्थळी नेऊन बलात्कार केला असावा, असा तर्क लावला जात आहे.
यापूर्वीही स्वारगेट बस स्थानकावर महिला आणि मुलींची छेडछाड होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवून संशयितांची चौकशी करून त्यांना हुसकावून लावले होते. मात्र, सराईत गुन्हेगार वारंवार परत येत असल्याने पोलिसी कारवाईत अडथळे येत होते, असेही स्पष्ट झाले आहे.
तपासाची चक्रे वेगाने फिरली, आरोपीच्या हालचालींवर लक्ष
घटनेच्या दिवशी गाडे किमान दीड-दोन वाजल्यापासून स्वारगेट बस स्थानकात उपस्थित होता, याबाबत पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपासून आणि त्याच्या घराची झडती घेऊन तपासाची गती वाढवली.
गाडेचा आणखी काही गुन्ह्यांशी संबंध असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विशेषतः, छेडछाडीच्या प्रकरणांमध्ये अनेक तक्रारदार पुढे येत नसल्याने त्याचे धारिष्ट्य वाढले असावे, असे पोलिसांचे मत आहे. त्याच्याबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मास्कमुळे ओळख कठीण, पण पोलिसांनी शोधले पुरावे
सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी मास्क घालून दिसत असल्याने त्याची ओळख पटवणे कठीण होते. मात्र, पोलिसांनी परिसरातील इतर सीसीटीव्ही तपासले आणि खबऱ्यांकडून माहिती मिळवल्यानंतर त्याची ओळख निश्चित करण्यात यश मिळवले.
पोलिसांनी त्याच्या संपर्कातील राजकीय आणि पोलिस कर्मचाऱ्यांची चौकशी सुरू केली असून, आणखी काही धक्कादायक बाबी समोर येण्याची शक्यता आहे.