Virender Sehwag : माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग आणि त्याची पत्नी आरती यांच्या घटस्फोटाच्या चर्चांना सध्या उधाण आले आहे. मात्र, अशा चर्चांना अधिक रंगत देत सेहवागने स्वतः एका ‘लग्ना’ची माहिती दिली आहे. चार दिवस चालणाऱ्या या विवाह सोहळ्याबाबत त्याने व्हिडिओद्वारे खुलासा केला असून, तो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.
सेहवाग-आरतीच्या घटस्फोटाचे कारण काय?
सेहवाग आणि आरती यांच्या नात्यात तणाव असल्याची चर्चा एका व्हिडिओनंतर सुरू झाली. या व्हिडिओमध्ये सेहवाग फोनवर बोलताना दिसतो, तर आरती त्याच्यावर चांगलीच भडकलेली दिसते. या घटनेनंतर त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा अधिकच वाढल्या.
सेहवाग ‘ग्रे डिव्होर्स’ घेणार?
सेहवाग आणि आरती ‘ग्रे डिव्होर्स’ घेणार असल्याचे बोलले जात आहे. पण हा ग्रे डिव्होर्स नक्की काय आहे? तर, ज्या जोडप्यांच्या लग्नाला २० वर्षे झाली असतात आणि जे पन्नाशीच्या उंबरठ्यावर असतात, अशा व्यक्ती जेव्हा विभक्त होतात, तेव्हा त्याला ग्रे डिव्होर्स म्हणतात.
सेहवागच्या ‘लग्ना’चा व्हिडिओ व्हायरल
सेहवागने नुकत्याच व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये एक महत्त्वाची माहिती दिली आहे. त्याने सांगितले की, फेब्रुवारी महिन्यात बुंदेलखंडमध्ये निराधार मुलींसाठी सामूहिक विवाह सोहळा आयोजित केला जाणार आहे. २२ ते २६ फेब्रुवारी या कालावधीत बागेश्वर धाममध्ये हा विवाह सोहळा पार पडेल. या सोहळ्यात १५१ आदिवासी मुली आणि १४० इतर समाजातील मुलींचे विवाह होणार आहेत.
सेहवागने या मंगल सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन सर्वांना केले आहे. मात्र, या कार्यक्रमात तो स्वतःच्या घटस्फोटाबाबत काही भाष्य करतो का, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे. कारण त्याने अद्याप आपल्या वैवाहिक आयुष्याबद्दल कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.